scorecardresearch

भूमाता ब्रिगेडची पुन्हा एक धडक अयशस्वी

भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नाशिकच्या हद्दीवर रोखून टळलेला संघर्ष शुक्रवारी मात्र अटळ बनला.

त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भूमाता ब्रिगेडच्या वाहनास रोखताना स्थानिक महिला व कार्यकर्ते. 
(छाया - कमलाकर अकोलकर)
त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भूमाता ब्रिगेडच्या वाहनास रोखताना स्थानिक महिला व कार्यकर्ते. (छाया – कमलाकर अकोलकर)

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या शिव मंदिरातील गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा, या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शुक्रवारी मंदिरात जाऊनही स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे गर्भगृहात प्रवेश न करता माघारी फिरावे लागले. या वेळी स्थानिकांनी देसाई यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या आंदोलनाला कोणाची फूस आहे, याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे साधारणत: महिनाभरापासून या विषयावर हिंदुत्ववादी संघटना आणि ब्रिगेड यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. स्थानिकांनी प्रथा परंपरांचा संदर्भ देऊन महिलांच्या गर्भगृहातील प्रवेशास आक्षेप घेतला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नाशिकच्या हद्दीवर रोखून टळलेला संघर्ष शुक्रवारी मात्र अटळ बनला. शुक्रवारी सकाळी देसाई या काही महिलांसह त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाल्या. हा विषय केंद्रस्थानी असल्याने स्थानिक महिला सजग होत्या. याआधीच त्यांनी मंदिरात गनिमी काव्याने प्रवेश करण्याचा इशारा दिला असल्याने शुक्रवारी काय होईल, याकडे सर्वाचे लक्ष होते. सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश केल्यावर स्थानिकांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू केले.
त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाहनाला घेराव घालून त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले. पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्या वेळी पूजा सुरू असल्याने भाविकांसाठी दर्शन बंद होते. त्यामुळे त्यांना संस्थानच्या कार्यालयात बसून राहावे लागले. दरम्यानच्या काळात स्थानिक महिला व कार्यकर्ते मंदिर आवारात जमा झाले.
त्यांनी मंदिर परिसरातील प्रवेशद्वार ते गाभाऱ्यापर्यंत मानवी कडे तयार केले. देवस्थानचे पूजक बाहेर पडल्यावर त्यांनी मंदिरात प्रवेश केला. चंद्रकांत अकोलकर, संजय लोहगांवकर यांच्या सहकार्याने अभिषेकाचा संकल्प केला. मंदिराच्या गाभाऱ्यातून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत जात त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. स्थानिकांनी मानवी साखळी केल्यामुळे त्यांना तेथून बाहेर पडणे भाग पडले. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गर्भगृहात प्रवेशास आक्षेप घेतला.
या काळात देसाई यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. स्थानिक महिला आणि कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून शिवीगाळ केली. पोलिसांनी देसाई यांना कसेबसे बाहेर काढले. देसाई यांनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन आनंद आणि समाधान वाटल्याचे सांगितले. आपण मंदिर प्रवेशाचा संकल्प केला असून गनिमी काव्याने किंवा सर्वाच्या साक्षीने मंदिरात प्रवेश करेल.
आपण स्वत: हिंदू असून पूजा-अर्चा करते. गर्भगृहात प्रवेशासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या मंदिर व गर्भगृहातील प्रवेशास स्थानिक महिलांचा विरोध असला तरी बाहेरील सर्व महिलांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2016 at 02:17 IST

संबंधित बातम्या