नाशिक : मैत्रिणीबरोबर असलेले खासगी छायाचित्र समाजमाध्यमात टाकण्याची धमकी देत २० लाख रुपयांची मागणी एका डाॅक्टरकडे करणाऱ्या संशयितांविरुध्द त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी वेगवेगळ्या भ्रमणध्वनींवरुन संशयितांकडून देण्यात येत होती. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा सूत्रधार भ्रमणध्वनी दुरूस्ती करणारा दुकानदार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील एका डाॅक्टरने भ्रमणध्वनी नादुरूस्त झाल्याने दुरूस्तीसाठी तुषार सोनवणे, राहुल चव्हाण यांच्याकडे दिला. दुरूस्तीच्या कामासाठी त्यांनी भ्रमणध्वनीचे संकेतांक तसेच अन्य तपशील दुकानदारांना दिला. या संकेतांकाचा दुरूपयोग करत त्यांनी डाॅक्टरचे मैत्रिणीबरोबर असलेले छायाचित्र आपल्याकडे घेतले. भ्रमणध्वनी दुरूस्त केल्यानंतर तो त्यांना परत दिला. नंतर वेगवेगळ्या क्रमांकावरून मैत्रिणीबरोबर असलेले डॉक्टरांचे छायाचित्र त्यांच्या पत्नीला दाखविण्याची धमकी देत पैसे मागण्यात येऊ लागले..त्यांच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली.

डाॅक्टरकडून पैसे मिलत नसल्याचे पाहून फेसबुकवर बनावट खाते तयार करुन त्या माध्यमातून संबंधित छायाचित्र प्रसारित करण्यात आले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, डाॅक्टरांनी संशयित राहुल व तुषार याच्याविरूध्द त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही संशयित फरार आहेत. अशा पध्दतीने कोणाची फसवणूक झाली असल्यास लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्र्यंबक पोलीस ठाणे निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी केले आहे.