नाशिक – राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याचा समावेश नसल्याने निषेध करण्यासाठी तसेच हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्र्यंबकेश्वर तसेच हरसूल परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे पालघर, जव्हारकडे जाणारी वाहतूक खोळंबली.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण, पिकांची परिस्थिती , पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पाहता शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता याविषयी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा , शेतकऱ्यांसह इतरांना शासनाच्या दु्ष्काळी सवलती व मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा तसेच हरसूल परिसरात ग्रामीण रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास युवकांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ येईल, जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. आंदोलकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या राज्यातील सत्ताधाऱ्यांसह अन्य पक्षातील प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनामुळे संबंधित ठिकाणी वाहतुक कोंडी झाली. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. यावेळी विनायक माळेकर, राहुल बोरसे, समाधान बोडके पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलकांच्या मागण्या

त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा. पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना दुष्काळ सवलती व शासनाच्या विविध योजनांचे लाभ तातडीने लागू करावेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात यावा. शेतीपंप व इतर कृषीविषयक देयकांबाबत सवलती द्याव्यात. तालुक्यातील परिस्थितीची शासकीय यंत्रणेच्या वतीने तातडीने पाहणी करत आवश्यक मदत जाहीर करावी.