नाशिक – त्र्यंबकेश्वर परिसरात ४८ तासांहून अधिक तासांपासून पाऊस सुरू आहे. ग्रामीण भागातील काही छोट्या पुलांवरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला. काही भागात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. त्र्यंबकेश्वर तसेच ग्रामीण भागात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत असतांना कुंभमेळ्याची कामे ठप्प झाली आहेत.

जोरदार पावसाने शहरातील भगवती चौक, बोहोर पट्टी, मेनरोड, लक्ष्मीनारायण चौक, गंगाकाठ या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्र्यंबकेश्वर – जव्हार-पालघर रस्त्यावरील गणपत बारी येथे डोंगराचा काही भाग खचल्याने रस्त्यावर मातीचा तसेच दगडाचा ढिगारा आला. यामुळे रस्त्याचा अर्धा भाग पूर्णपणे बंद झाला.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती मिळाल्यावर पथक घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने दरड आणि मातीचा ढिगारा हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम करण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले. बेझे फाटा ते बेझे गाव या दरम्यान जाणारा रस्ता पावसामुळे वाहून गेला.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थान हे भाविकांना दर्शन घेण्यासाठी बंद होते. बाहेरगावहून नारायण नागबळी यासह अन्य धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्र्यंबकेश्वर कडे येणारा नाशिकचा रस्ताही खचल्याने वाहतुकीवर याचा परिणाम झाला.

दरम्यान, नील पर्वताच्या पायथ्याशी जलसंपदा विभागाच्या वतीने बेझे वॉटर ग्रीड प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या जलवाहिनीसाठी त्र्यंबकच्या दिशेने जाणारा एक छोटा रस्ता खोदण्यात आला. पावसामुळे खोदलेल्या रस्त्याच्या वरील बाजूस दरड कोसळली. त्यामुळे याठिकाणच्या वस्तीचा त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता पुर्णपणे बंद झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर प्रांत अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्यधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पावसाने पिंपळद येथील किकवी नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने साबरवाडी, ब्राम्हणवाडे, माळेगाव, दिव्याचा पाडा या गावांचा संपर्क तुटला. वाहतूक ठप्प झाली. हिरडी येथील पुलावर कंबरेइतके पाणी आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे घाट परिसरात पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने होणारी गर्दी पाहता पोलिसांकडून गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.