नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे बाहेरील अनधिकृत पुरोहितांकडून धार्मिक विधीच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक होत आहे. तसेच समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करत भाविकांना वेगवेगळ्या पूजा व त्यांचे माफक दर सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे. अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कारवाई करण्याची मागणी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन दिले. त्र्यंबकेश्वर हे प्राचीन धार्मिक व तीर्थक्षेत्र असून, येथे दर्शनासाठी तसेच विविध धार्मिक विधी व पूजांसाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या तीर्थक्षेत्रातील धार्मिक परंपरा, विधी व व्यवस्थेमध्ये स्थानिक पुरोहित समाजाची पारंपरिक व महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
मात्र, अलीकडील काळात त्र्यंबकेश्वर येथे बाहेरून येणाऱ्या काही अनधिकृत पुरोहितांकडून भाविकांना धार्मिक विधी करून देण्याच्या नावाखाली संपर्क साधला जात असून, त्यातून भाविकांची दिशाभूल व मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पुरोहित संघाकडे आल्या आहेत. निवेदन देताना पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे व अन्य कार्यकारिणी सदस्य या वेळी उपस्थित होते. पुरोहित संघाकडून मागील दोन महिन्यांत दुसऱ्यांदा या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे.
फसवणूक कशी ?
विविध ऑनलाइन ॲप, संकेतस्थळे आणि समाजमाध्यमांवरून जाहिराती प्रसारित करत ऑनलाइन पद्धतीने पूजेची नोंदणी केली जात आहे. प्रत्यक्षात पूजा कोणाकडून, कुठे व कोणत्या पद्धतीने केली जाते, याबाबत पारदर्शकता नसल्याने भाविकांची फसवणूक होत आहे.
बाहेरील पुरोहितांवर कारवाईची मागणी
या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या अनधिकृत बाहेरील व्यक्ती व पुरोहितांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, भाविकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्ती, एजंट व मध्यस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी, भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन सेवा व संबंधित व्यक्तींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, भाविकांची सुरक्षितता व धार्मिक विधींची पारदर्शकता यासाठी आवश्यक त्या सूचना व उपाययोजना अंमलात आणाव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या.
