नाशिक : श्रावणानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना ब्रह्मगिरी फेरीला विशेष महत्त्व आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. यंदा पाच लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्र्यंबक नगरीत येणाऱ्या भाविकांना रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छतागृहांची अपुरी सुविधा यांसह विविध अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्र्यंबक नगरपालिकेकडून नियोजनाचा दावा करण्यात येत असला, तरी तोकड्या सोयी-सुविधा आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी फेरीसाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. भाविकांच्या शारीरिक क्षमतेनुसार ब्रह्मगिरी फेरी दोन टप्प्यांत केली जाते. पहिली फेरी सुमारे २० ते २१ किलोमीटरची आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त कुंड, गौतम ऋषी आश्रम, ब्रह्मगिरी पर्वताची पायथ्याने परिक्रमा, प्रयागतीर्थ, परशुराम मंदिर आणि पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिर असा या फेरीचा मार्ग आहे. दुसरी फेरी सुमारे ४२ किलोमीटरची आहे. त्र्यंबकेश्वर पंचलिंग, गंगाद्वार, लग्नस्तंभ, नीलपर्वताच्या मागील बाजूने ही प्रदक्षिणा केली जाते. हरिहर, हर्षकिल्ला, पायथा वेताळ तसेच जुने सरोवर कुंड या मार्गात येतात. निसर्गरम्य परिसरातून जाणाऱ्या या फेरीसाठीही भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबक नगरीत दाखल होत आहेत.

कुंभमेळ्याच्या कामांसाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील अनेक रस्ते सध्या खोदून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण हटविल्यानंतरचा सिमेंटचा राडारोडाही कायम आहे. मंदिराजवळ पत्र्यांचे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. रस्त्यांच्या खोदकामामुळे पावसाचे पाणी आणि चिखल रस्त्यावर येत असल्याने भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारी गुरू गोरक्षनाथ मठाच्या मंडपात भाविकांच्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सोमवारी सर्व प्रकारचे सशुल्क दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

दहा सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडली

देवस्थान परिसर, कुशावर्त तीर्थ, वाहनतळासह शहरातील विविध ठिकाणी असलेली सुमारे दहा सार्वजनिक स्वच्छतागृहे कुंभमेळ्याच्या कामांसाठी पाडण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांच्या नैसर्गिक विधीच्या सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुशावर्त तीर्थावर स्नान केल्यानंतर महिलांसाठी वस्त्रांतराची सुविधा करण्यात आली असली, तरी ती अपुरी असल्याच्या तक्रारी आहेत.

१७४ तात्पुरती स्वच्छतागृहे तिसऱ्या श्रावण सोमवारी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने नियोजन केल्याचा दावा केला आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली असली, तरी कुशावर्त, गणपतबारी, दर्शनरांग, प्रयागतीर्थ तसेच ब्रह्मगिरी फेरीच्या मार्गावर एकूण १७४ तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. कुशावर्ताच्या उत्तरेकडे महिलांसाठी वस्त्रांतराची सुविधाही करण्यात आली आहे.