नाशिक – तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविकांनी बम बम भोलेच्या गजरात दर्शनासाठी गर्दी केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश नाकारल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली. रविवारी मध्यरात्री ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर दोन ते तीन वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. भाविकांना स्वच्छतागृह, कपडे बदलण्याची व्यवस्था नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागले.

तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रविवारी सायंकाळी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले. रविवारी रात्री आठ वाजेपासुन भाविकांनी कुशावर्तात स्नान करुन ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरूवात केली. बम बम भोले च्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली. सकाळी प्रदक्षिणा मार्गावर विविध ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांकडून भाविकांसाठी चहा आणि अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी काही भाविक मध्यरात्रीपासून मार्गस्थ झाले.

तर काही भाविक पहाटे प्रदक्षिणेला रवाना झाले. भाविकांची गर्दी पाहता पोलिसांनी काही ठिकाणी ही गर्दी थांबवली. यामध्ये कुंभमेळा बस स्थानक, जव्हार रोड, पोलीस ठाणेमार्गे सुंदराबाई मठ आणि त्यानंतर कुशावर्त तीर्थ असा भाविकांच्या हालचालींचा मार्ग ठरविण्यात आला. दुसरीकडे, खासगी वाहनांना तळेगाव, प्रयाग तीर्थ, गजानन महाराज संस्थान येथे अडविण्यात आले. यंदा फेरीत महिला, मुलींचे प्रमाण अधिक होते. ब्रह्मगिरी फेरीस प्रयागराज तीर्थबाजून सुरूवात होते.

यासाठी बोगद्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र भाविकांनी बोगद्याचा वापर न करता रस्त्यावरून जाणे पसंत केले. रात्री गजानन महाराज संस्थान, पेगलवाडी परिसरात अंधार असल्याने भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. प्रयाग तीर्थकडून प्रदक्षिणेसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाचा वापर कोणी केला नाही. त्र्यंबकेश्वर गावातही भाविक तसेच पर्यटकांची कुशावर्त परिसरात गर्दी राहिली.

त्र्यंबकेश्वर येथे प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या भाविकांकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक, पहिणे, अंबोली, इगतपुरी, घोटी यासह अन्य ठिकाणाहून २८० हून अधिक बसची व्यवस्था करण्यात आली. खासगी वाहनांना बंदी असल्याने महामंडळाच्या बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. बसेस गर्दीने तुडुंब असल्याने अनेकांना पुढील बस येईपर्यंत वाट पहावी लागली. त्र्यंबक देवस्थानमध्ये दर्शनासाठी गर्दी राहिली. जास्तीजास्त भाविकांना दर्शन व्हावे, यासाठी देवस्थानच्या वतीने देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळी देवस्थानच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविकांसाठी गोरक्ष महाराज मठात थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती.