जळगाव : राज्यभर दुधासह दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर मोहीम सुरू केली असतानाही जळगाव जिल्ह्यात बनावट खव्याचा काळाबाजार सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यात तयार होणारा दुधाच्या पावडरमध्ये वनस्पती तेल आणि इतर घटक मिसळून बनवलेला बनावट खवा चोरट्या मार्गाने जळगावात आणला जात असून, त्याच खव्यापासून तयार केलेले पेढे तसेच मिठाई शहरातील काही दुकानांमध्ये सर्रास विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळीविरोधी कारवाया तीव्र केल्यानंतर अस्सल खव्याचा पुरवठा घटला असून, त्याचे दरही वाढले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत बनावट खव्याची विक्री करणाऱ्या रॅकेटने पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे. प्रशासनाच्या वाढत्या कारवायांनंतरही हा खवा जळगावात मोठ्या प्रमाणावर पोहोचत असल्याने यामागे मजबूत साखळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बनावट खव्याचे दरही वाढले

काही महिन्यांपूर्वी बीडहून जळगावात येणारा बनावट खवा सुमारे २८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत होता. मात्र, अलीकडील कारवायांमुळे त्याची उपलब्धता कमी झाल्याने आता त्याचा दर थेट ३२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे, हा खवा सर्वांनाच उपलब्ध करून दिला जात नसून, केवळ विश्वासू आणि नेहमीच्या ग्राहकांनाच गुप्त पद्धतीने विक्री केली जात असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधितांकडून अत्यंत सावधगिरीने व्यवहार केले जातात. मालाची वाहतूक, साठवण आणि वितरण यामध्ये गोपनीयता राखली जात असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा बनावट खवा बाजारात पोहोचत असला तरी कारवाईच्या जाळ्यात सहज सापडत नसल्याचे चित्र आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

बीडच्या बनावट खव्यापासून पेढे, बर्फी, कलाकंद, गुलाबजाम तसेच इतर दूधजन्य मिठाई तयार करून काही ठिकाणी विक्री होत असल्याचेही सांगितले जाते. ग्राहकांना अस्सल आणि भेसळयुक्त मिठाईतील फरक सहज ओळखता येत नसल्याने त्यांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात अशा मिठाईची मागणी वाढत असल्याने भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठाही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

जळगावपर्यंतचा मार्ग सुरक्षित कसा?

दरम्यान, बीडहून जळगावपर्यंत शेकडो किलो बनावट खवा नियमितपणे पोहोचत असल्याची चर्चा असताना तो मार्गात कोणत्याही तपास यंत्रणेच्या हाती कसा लागत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात भेसळीविरोधी मोहीम सुरू असताना अशा प्रकारचा माल जिल्ह्यात बिनधास्तपणे पोहचत असल्याने वाहतूक, तपासणी आणि अंमलबजावणी यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बनावट खव्याच्या पुरवठा साखळीचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच मिठाई उत्पादक, विक्रेते आणि पुरवठादारांची तपासणी अधिक तीव्र करून बाजारातील भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.