महानगरपालिकेचे २०१८-१९ वर्षांचे अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत सादर करण्याचा आयुक्तांचा प्रयत्न सत्ताधारी भाजपने धुडकावत ते प्रथम स्थायी समितीत सादर करावे, असा निर्णय घेतला. विषयपत्रिकेतील अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मागे घेऊन ते स्थायी समितीमार्फत २८ मार्च रोजी सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या मुद्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला.

अंदाजपत्रकाचा प्रस्ताव मांडणाऱ्या आयुक्तांना म्हणणे मांडू द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. भाजपने ती मागणी फेटाळत सभेचे कामकाज गुंडाळले. यामुळे संतप्त झालेल्या सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. भाजपच्या दादागिरीवर आगपाखड करीत विरोधक आयुक्तांच्या मदतीला धावून आल्याचे पहावयास मिळाले. अंदाजपत्रक सादर करण्याच्या मुद्यावरून आयुक्त आणि भाजप यांच्यात आधीच मतभिन्नता होती.