धुळे : राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर भूमिका घेणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. सोनगीर टोलनाक्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने २३ लाख ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व मालवाहू वाहन जप्त केले. या प्रकरणी राजस्थानातील चालकाविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जून २०२६ रोजी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोलनाका परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी संशयास्पद मालवाहू वाहन (क्र. एचआर-५५ एई-६८२१) थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल पान मसाला व व्ही-१ टोबॅको तंबाखूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
१७ लाख ७६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला
कारवाईदरम्यान १७ लाख ७६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला, ७४ हजार रुपये किमतीची व्ही-१ टोबॅको तंबाखू तसेच सुमारे पाच लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा एकूण २३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुरेश कुमार बिरबलराम गुर्जर (वय ३४, रा. धानी नापावली, पोस्ट डुंगा की नागल, ता. का. ठाणा, जि. सीकर, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध कलमांन्वये सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत भारत राणे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल व त्यांच्या पथकाने केली. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या साखळीवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. राज्यातील विविध भागांप्रमाणेच धुळे जिल्ह्यातही प्रतिबंधित गुटखा व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
राज्यभरात मोहीम
यासोबतच अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठवणूक व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या धडक कारवायांमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून, धुळे जिल्ह्यातील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाचा वापर करून राज्यात प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशा कारवायांमुळे युवकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
