नाशिक: राज्याचे अन्न व औषध प्रशासन प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील हॉटेल्स व खाद्यगृहांची तपासणी करण्यात आली. त्यात गंभीर स्वरुपाच्या बाबी आढळलेल्या नऊ हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले. तर आवश्यक नोंदणी व परवाना नसल्याने चार हॉटेलला व्यवसायास प्रतिबंध करण्यात आला.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र हॉटेल व रेस्टॉरटची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिक विभागात दोन दिवस विविध हॉटेल आणि खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात आली. या काळात एकूण २० हॉटेल व खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, अस्वच्छतेत उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव तसेच संबंधित आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव, कार्यरत कर्मचाऱ्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करणे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि त्या अंतर्गत विविध नियम व विनियमांचे उल्लंघन या कारणावरून संबंधित हॉटेल व आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार, जळगाव येथील दोन तर नंदुरबार येथील एका हॉटेलचा समावेश आहे.
पंचवटीतील जत्रा लिंक रस्त्यावरील हॉटेल ग्रीन वॉल, द्वारका येथील हॉटेल राधिका, पंचवटीतील पेठ रस्त्यावरील हॉटेल क्राऊन पॅलेस, सिन्नर येथील लक्ष्मी हॉटेल, जळगाव एमआयडीसीतील अजिंठा रस्त्यावरील हॉटेल त्रिमूर्ती आणि जळगावमधील हॉटेल भानूस नंदुरबार येथील जाधव रेस्टॉरंट यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. या शिवाय यापूर्वी दिलेल्या सुधारणा नोटीसमधील त्रुटींची मुदतीत पूर्तता न केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील साकेगाव शिवारातील हॉटेल जय आणि धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पस परिसरातील गजानन कॅन्टिन या दोन हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले.
चार हॉटेल्सला व्यवसाय बंदी
तपासणीत चार हॉटेल आस्थापनांकडे वैध अन्न व व्यवसाय नोंदणी नोंदणी व परवाना उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. या आस्थापनांना अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांन्वये आवश्यक वैध नोंदणी अथवा परवाना प्राप्त करेपर्यंत अन्न व्यवसाय करण्यास पूर्णत: बंद ठेवण्याचे लेखी निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रारी नोंदविण्याचे आवाहन
नाशिक विभागात विशेष तपासणी मोहीम यापुढील काळात अधिक व्यापक स्वरुपात सुरू राहणार आहे. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने व खाद्य गृहांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक हाताळणी व विक्री याबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनीही अन्न पदार्थांचा दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग,नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवून सुरक्षित अन्न अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन या विभागाचे नाशिकचे सहआयुक्त मंगेश माने यांनी केले आहे.
