मालमत्ता प्रदर्शन; १५ ते २० दिवसात दोन हजार सदनिकांच्या नोंदणीचा अंदाज

नाशिक : तब्बल दोन वर्षांनंतर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित मालमत्ता प्रदर्शनात नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर, ठाणे, मुंबई व पुणे येथील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. चार दिवसीय प्रदर्शनात सुमारे ४० हजार नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनाचा समारोप खा. हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढील १५ ते २० दिवसात दोन हजार सदनिकांची नोंदणी होईल. यामुळे शहरात ६०० कोटींची उलाढाल होणार असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे.

खा. गोडसे यांनी शहराच्या वाढलेल्या दळणवळणाच्या संधींमुळे अनेक कवाडे उघडत असल्याचे सांगितले. येत्या काही काळात नाशिक विमान सेवेद्वारे अनेक महत्वांच्या शहरांशी जोडले जाणार आहे. तसेच नाशिक-पुणे रेल्वे सेवेचेही काम प्रगतीपथावर आहे. इतर शहरांशी संपर्क वाढल्यास अनेक संधी नाशिकला उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

प्रदर्शनास मिळालेल्या प्रतिसादामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून येत्या १५ ते २० दिवसांत सुमारे दोन हजार सदनिकांची नोंदणी होणार आहे. यामुळे सुमारे ६०० कोटींची उलाढाल शहरात होणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी दिली. प्रदर्शन कालावधीतच सुमारे ३८० सदनिकांची जागेवर नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम उद्योगामुळे रोजगार निर्मिती होते. शासनाला मोठय़ा प्रमाणात महसूलही  प्राप्त होतो. प्रदर्शनातील प्रतिसादाने येत्या काही दिवसात नाशिकचे एकूणच अर्थकारण बदलेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये अन्य शहरातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. हेच प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे अधोरेखित झाल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर यांनी सांगितले. प्रदर्शनात ७० विकासकांचे ५०० हून अधिक पर्याय तेही अगदी १५ लाखांपासून ते पाच कोटींपर्यंतचे उपलब्ध होते. संपूर्ण वातानुकुलीत दालन व्यवस्थेमुळे दुपारीही प्रदर्शनास भेट देणाऱ्यांची गर्दी झाल्याचे सहसमन्वयक मनोज खिंवसरा यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, किरण चव्हाण आदींच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष कृणाल पाटील व मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार आदींनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.