twenty five quintals of cotton worth rs 2 5 lakh kept in farm sheds stolen zws 70 | Loksatta

जळगाव : शेतशिवारामधून अडीच लाखांची कापूसचोरी

याप्रकरणी पिंपळगाव हरेश्‍वर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : शेतशिवारामधून अडीच लाखांची कापूसचोरी
(संग्रहित छायाचित्र)

पाचोरा तालुक्यातील भोजे येथील शेतकर्‍याचा राजुरी खुर्द शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला सुमारे अडीच लाखांचा वीस ते पंचवीस क्विंटल कापूस भुरट्या चोरट्यांकडून लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्‍वर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मद्यांच्या खोक्यांसह कंटेनर घेऊन फरार टोळी ताब्यात; १० जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी

भोजे येथील शेतकरी देवराम माळी यांचे गावानजीकच्या राजुरी खुर्द शिवारात शेत आहे. यंदा त्यांनी कपाशीची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे मोठे नुकसान होऊन शेतकरी माळी हे संकटात होते. अगोदरच त्यांना कापूस उत्पादनात मोठी घट आली असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे. यातच भरीस भर म्हणून मोठ्या कष्टाने लावलेला कापूस भुरट्या चोरट्यांनी लांबविल्याने ते अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. कापूस चोरट्यांनी खेडा खरेदीधारकांना विकल्याचा संशय व्यक्त केला आहे. शेतकरी माळी यांनी, पिंपळगाव हरेश्‍वर, शिंदाड, राजुरी, चिंचपुरे, वरखेडी या गावशिवारांलगतच्या त्यांच्या शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनी लांबविल्याची संशय व्यक्त केला आहे. परिसरात कापसाची खेडा खरेदी सुरू असून, ज्यांच्याकडे शेती नाही, तेही कापूस विकताना दिसत असून, त्यांचीही चौकशी करावी. शिवाय, अशा कापूस विकणार्‍यांना खरेदी न करण्याच्या सूचना खेडा खरेदीधारकांना द्याव्यात व भुरट्या चोरट्यांवर आळा घालावा, अशा आशयाची तक्रार दिल्यावरून पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, हवालदार पांडुरंग गोरबंजार तपास करीत आहेत. दरम्यान, एक नोव्हेंबर रोजी एरंडोल तालुक्यातील जवखेडासिम शिवारातून शेतकरी शंकर सोनवणे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधून ऐंशी हजारांचा दहा ते बारा क्विंटल कापूस चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-11-2022 at 17:56 IST
Next Story
मद्यांच्या खोक्यांसह कंटेनर घेऊन फरार टोळी ताब्यात; १० जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी