धुळे – तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली. परिणामी, सोमवारी सकाळपासून अक्कलपाडा धरणातून टप्याटप्याने ४५ हजार क्यूसेकने विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदीवरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील दोन पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
धुळे शहरासह साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पांझरा नदी व अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून विसर्ग वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रविवारपासून निम्नपांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. अक्कलपाडा प्रकल्पाचे १४ दरवाजे एक मीटरने तर तीन दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आले. निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पातून सोमवारी दुपारी ३८ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने पांझरेला पूर आला आहे.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणला; प्रकाश आंबेडकर यांचा प्रश्न
हेही वाचा – नाशिक : पेसा भरतीसाठी आंदोलन तीव्र करणार – जे. पी. गावित यांचा इशारा
पूरपरिस्थिती लक्षात घेता महानगरपालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेने पांझरा नदीवरील गणपती पूल, पाटचारी पूल, लहान पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सोमवारी सकाळी पाटचारी पूल व लहान पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे या पुलांवरील वाहतूक मोठ्या पुलावरुन वळवण्यात आली. वाहतुकीसाठी एकच पूल शिल्लक असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. नदीकिनारी बांधलेले गायी, म्हशींचे गोठे रिकामे करण्यास सांगितले आहे. जिल्हा व पोलिसांच्या वाहनांनी नदीकिनारी गस्त घालून ध्वनिक्षेपकाव्दारे नागरिकांना सूचना करण्यात आली. महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी पाहणी करुन पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त हेमंत निकम, शोभा बाविस्कर, समिर शेख, अभियंता चंद्रकांत ओगले, सचिव मनोज वाघ, प्रसाद जाधव, किशोर सुडके, कैलास लहामगे आदी कर्मचारी उपस्थित होते.