नाशिक – नगर-मनमाड रस्त्यावरील आंबेवाडी शिवारात शुक्रवारी पहाटे मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने मोटारीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला तर, एक जण जखमी झाला. मृत व जखमी हे सर्व येवला तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी आहेत.

एका मित्राला मनमाड रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी मोटारीने जात असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. आंबेगाव शिवारात पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांच्या मोटारीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, संबंधितांची मोटार रस्त्यावरून २० ते २५ फूट अंतरावर फेकली गेली. तिचा पूर्णत चक्काचूर झाला. मोटारीत मागील आसनावर बसलेले आकाश पवार आणि नीलेश शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक शुभम मानमळे हे गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेतली. मदतकार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाहनाचा पत्रा कापावा लागला. जखमी मानमळे यांना येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या वाहनाने मोटारीला धडक दिली, तो वाहनधारक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.