लोकसत्ता प्रतिनिधी जळगाव: जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी हिसकाविणाऱ्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांनी तब्बल १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून २५ तोळे जप्त केले असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत एम. राजकुमार यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत १९ जबरी चोरीतील दोन संशयितांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. दत्तात्रय बागूल (३९, रा. मोहननगर, मूळ रा. मोहाडी, जि. धुळे) आणि सुधाकर ऊर्फ जितेंद्र महाजन (२५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. हेही वाचा. मालेगाव : पाण्यासाठी माळमाथ्याचा हंडा मोर्चा रामानंदनगर, जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील, सहायक निरीक्षक रोहिदास गभाले, हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, विजय खैरे, प्रवीण वाघ, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींचे पथक नियुक्त करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी नूतन वर्षा कॉलनी भागात ७० वर्षाच्या महिलेची सोनसाखळी लांबविणारा दत्तात्रय बागूल याला पथकाने पकडले. त्याची कसून चौकशी केली. त्याने सोनसाखळी चोरीचे १९ गुन्हे केल्याची कबुली देत साथीदार सुधाकर महाजन हादेखील सहभागी असल्याचे सांगताच त्यालाही अटक करण्यात आली. संशयितांनी २०१८ ते मे २०२३ या कालावधीत रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५, तर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, असे सोनसाखळी चोरीचे १९ गुन्हे केले आहेत.