जळगाव : काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यात पुन्हा दोन जणांच्या खूनाची भर पडली आहे. दुचाकीची चावी हरविल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने मित्रानेच धारदार शस्त्राने वार करीत मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील खोटेनगर बसथांब्याजवळ घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली. कुसुंबा येथील अविनाश अहिरे (३५) हा खोटेनगरातील बसथांब्याजवळील अंडाभूर्जीच्या हातगाडीवर मोटारीने आला. तेथे दीपक पाटील (रा. पिंप्राळा) याच्यासह अन्य दोघे मित्र आले. अविनाशची दुचाकी दीपक पाटील याच्याकडे होती.
मात्र, दुचाकीची चावी गहाळ झाल्याने अविनाशने दीपककडे त्याबाबत विचारले. त्यानंतर चावी शोधत आहे, असे दीपकने सांगितल्यानंतर शाब्दिक वाद वाढत गेला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दीपकसह अन्य दोघांनी धारदार शस्त्र भोसकल्याने अविनाश गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात अविनाशचा मृत्यू झाला. अविनाशच्या खूनप्रकरणी महेश सोनवणे (रा. चंदूअण्णानगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित दीपक पाटील, साहिल खान, अमोल गवई (रा. संत मीराबाईनगर, पिंप्राळा, जळगाव) यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मुक्ताईनगरही खूनाच्या घटनेने हादरले. मुक्ताईनगर शहरानजीकच्या सातोड शिवारातील बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यालगतच्या नाल्यात मृतदेह आढळून आला. रवींद्र पाटील (४६, रा. चिनावल, ता. रावेर) असे मृताचे नाव आहे. मारेकर्याने चेहर्यावर दगडाचे वार केल्याचे, तसेच डोक्यावर टणक वस्तूने प्रहार केल्याने दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे



