दुचाकीस्वारांसह सहप्रवाशांच्या प्रबोधनासाठी १२ केंद्रे

नाशिक : शहरात दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करावे, यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. एक ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत २७ अपघातांमध्ये एकूण २५ जणांचा हेल्मेटअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये चार महिला दुचाकीस्वारांचाही समावेश आहे. हेल्मेटसाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे लक्षात घेऊन शहर पोलिसांनी आता गर्दीच्या बारा ठिकाणी हेल्मेट परिधान न करणारे दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांचे समूपदेशनाद्वारे प्रबोधन करण्याचे ठरविले आहे.

समूपदेशन केंद्रावर संबंधितांना १० गुणांची परीक्षा द्यावी लागेल. त्यात पाचपेक्षा कमी गुण मिळणाऱ्यांचे अधिकचे दोन तास समूपदेशन करण्यात येणार आहे. हेल्मेट नसेल तर पेट्रोल नाही, हेल्मेटविना शासकीय, खासगी कार्यालय परिसरात प्रवेशास प्रतिबंध, हेल्मेट परिधान न करणाऱ्यांचे समूपदेशन असे उपाय राबविले जात आहे. भरारी पथकाने विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पकडल्यानंतर नाशिक फस्र्टच्या केंद्रात समूपदेशनासाठी पाठविले जात होते. ही कारवाई आता बंद करम्ण्यात येणार आहे. त्याऐवजी शहर वाहतूक विभागाने गर्दीची १२ ठिकाणे निश्चित केली आहेत. तिथे हेल्मेट परिधान न करणारे चालक, सहप्रवासी यांचे समूपदेशन केले जाईल. पुस्तक वाचन, हेल्मेट वापराचे फायदे व परीक्षेद्वारे प्रबोधन केले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी म्हटले आहे.

कमी गुण मिळाल्यास अधिक समूपदेशन

विनाहेल्मेट वाहनधारकांना पकडल्यानंतर पोलीस पथक वाहन जमा करून ते वाहनतळावर उभे केले जाईल. दोन तासाचे समूपदेशन पूर्ण झाल्याची पावती दाखविल्यानंतर वाहनधारकास दुचाकी दिली जाईल. समूपदेशन केंद्रावर वाहतूक नियमांची १० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या दुचाकीस्वारांना पाच किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळतील, त्यांना अधिकचे दोन तास समूपदेशन करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. उपरोक्त १२ केंद्रांवर टेबल, खुर्ची, लेखनासाठीचे साहित्य, पेन आदी उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.

साडेपाच हजार दुचाकीस्वारांचे समूपदेशन

हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणाऱ्यांचे वाहतूक शाखेमार्फत नाशिक फस्र्टच्या केंद्रात सकाळ आणि दुपार सत्रात दैनंदिन ८० वाहनधारकांचे समूपदेशन केले जाते. नऊ सप्टेंबर २०२१ ते आतापर्यंत ५४७५  दुचाकीस्वारांचे समूपदेशन करण्यात आले आहे. आता १२ गर्दीच्या ठिकाणी केंद्र उभारून वाहनधारकांचे प्रबोधन केले जाणार आहे.