नाशिक – मागील कुंभमेळ्यावेळी मनसेच्या हातात नाशिक महापालिकेची सत्ता होती. त्यावैळी एकही झाड न तोडता कुंभमेळ्याचे उत्कृष्ट पध्दतीने नियोजन करुन दाखविले होते. परंतु, आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, तपोवनातील झाडे तोडली जात आहेत. ही झाडे गिरीश महाजन यांना तोडायची आहेत. यांच्यापेक्षा लाकुडतोड्या बरा, अशी घणाघाती टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली.

नाशिक महापालिका निवडणुकीतील मनसे, शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मनसे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) यांची संयुक्त सभा झाली. या सभेनिमित्ताने उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे नाशिकमध्ये सुमारे २३ वर्षानंतर प्रथमच एकत्र आले. या सभेत प्रारंभी राज ठाकरे यांचे भाषण झाले. त्यांनी तपोवनातील वृक्षतोडीच्या विषयावरुन भाजपचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले.

नाशिकमध्ये मनसेसह ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपने महापालिका निवडणुकीत संधी दिली. हा मुद्दाही राज ठाकरे यांनी मांडला. तपोवनातील झाडे छाटण्याआधी यांनी आपल्या पक्षातील झाडे छाटली. बाहेरुन झाडे मागवून आता ते भाजपमध्ये लावत आहेत, अशी टीका त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली.

भाजपकडून इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत संधी दिली जात असल्याने त्यांच्या पक्षात इतक्या वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्यांवर अन्याय होत आहे. १९५२ मध्ये जनसंघ नावाने जन्माला आलेल्या या पक्षाला २०२६ च्या निवडणुकीतही बाहेरून माणसे मागवावी लागत आहेत. स्वत:च्या पक्षातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारत बाहेरून आलेल्यांना संधी दिली. हा त्या कार्यकर्त्यांचा अपमान नाही का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे पक्षांतर पाहता चुकीचा कॅरम फुटला. कोणाच्या सोंगट्या कोणाकडे गेल्या हे कळत नाही. प्रत्येकाला विचारावे लागते आज कुठे, असा घणाघात त्यांनी केला. मनसे महापालिकेत सत्तेत असतांना केलेल्या कामांचा आढावा घेत नाशिक दत्तक घेणाऱ्याने नाशिकसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.

नाशिककर त्यांच्या भुलथापांना बळी पडले. नाशिककरांना त्या वेळी दिलेल्या वेगवेगळ्या घोषणांचे काय झाले, त्यातील किती प्रकल्प पूणई केले, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेना आणि मनसेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी खासदार संजय राऊत यांनीही तपोवनातील वृक्षतोडीवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली.