लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी सायंकाळी येथील एम. एस. जी. कॉलेज मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न असून त्यादृष्टीने जय्यत तयारी केली जात आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे व शिंदे गटात राजकीय संघर्ष पेटला आहे. कोकणातील खेडपेक्षाही मालेगावची सभा जोरात करण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहे. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोन्ही खासदार सभेच्या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. सभास्थळी भव्य सभामंडप उभारण्यात येत असून किमान एक लाख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
आणखी वाचा- दंगली घडवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा आरोप
शिंदे गटात गेलेले पालकमंत्री दादा भुसे यांना पर्याय म्हणून ठाकरे गटाने भाजपचे अद्वय हिरे यांना अलीकडेच पक्षात घेतले होते. या सभेत हिरे यांच्या अन्य समर्थकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर १७८ कोटी शेअर्स घोटाळ्याचा आरोप केला आहे. राऊत यांचे हे आरोप तद्दन खोटे असून माफी न मागितल्यास त्यांना धडा शिकविण्याचा इशारा शिंदे गटाने दिला होता. उभय गटातील वादामुळे सतर्क झालेल्या पोलीस यंत्रणेकडून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. संजय राऊत हे शुक्रवारपासूनच मालेगावात दाखल झाले आहेत. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी होत आहे. तालुक्यातील गावोगावी या सभेचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.