जळगाव : खान्देश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उधना–अमरावती विशेष रेल्वेच्या मागणीला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे आठवड्यातून तीन दिवस उधना–अमरावती विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी केली असून, या प्रस्तावाची रेल्वे प्रशासनाने सकारात्मक दखल घेत कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काळात या विशेष रेल्वेबाबत अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या २०९२५/२०९२६ सुरत–अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही रेल्वे दररोज चालविणे शक्य नसल्याने, तिच्या वेळापत्रकातील उर्वरित दिवसांमध्ये इतर गाड्यांची वाहतूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान वेळापत्रकात आवश्यक बदल करून उर्वरित तीन दिवस उधना–अमरावती विशेष रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने पश्चिम रेल्वेकडे सादर केला आहे. या प्रस्तावामुळे विद्यमान रेल्वे मार्गावर अतिरिक्त ताण न आणता प्रवाशांना नवीन सुविधा उपलब्ध करून देता येईल, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. या मागणीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनीही रेल्वे मंत्रालय तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. खान्देश आणि विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी विविध बैठका आणि पत्रव्यवहारातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात आहे.
डीआरयूसीसी बैठकीत सविस्तर चर्चा
दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीचे सदस्य तथा धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र एस. कोठारी यांनी देखील या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क साधून त्यांनी प्रवाशांच्या अडचणी मांडल्या असून, विशेष रेल्वे लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. २१ मे २०२६ रोजी आयोजित विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीच्या (डीआरयूसीसी) बैठकीतही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उधना–अमरावती विशेष रेल्वेचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी कोठारी यांनी खान्देश आणि विदर्भातील प्रवाशांची वाढती संख्या, सण-उत्सव, शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैद्यकीय कारणांसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन या रेल्वेची आवश्यकता अधोरेखित केली. प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत उपलब्ध रेल्वे सेवा अपुऱ्या पडत असल्याने अतिरिक्त विशेष रेल्वे सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या
उधना, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला आणि अमरावती या मार्गावरील हजारो प्रवासी या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. गुजरातमध्ये रोजगार, उद्योग-व्यवसाय आणि शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या खान्देश व विदर्भातील नागरिकांना या रेल्वेचा मोठा लाभ होणार आहे. तसेच व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रस्तावाची सकारात्मक दखल घेतल्याने उधना–अमरावती विशेष रेल्वे सुरू होण्याबाबत आशावाद निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक आणि कार्यान्वयनाच्या बाबींचा अंतिम आढावा घेतल्यानंतर या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून, खान्देश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
