जळगाव : भुसावळ–उधना मार्गावरुन धावणारी उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस यापूर्वी तीन दिवस चालवली जात होती. मात्र आता ही गाडी गुरुवारपासून दररोज धावणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवासी, कामगार मोठ्या प्रमाणावर उधना, सुरत आणि आसपासच्या औद्योगिक भागात कामासाठी जातात. त्यांच्यासाठी सुरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस दररोज सुरू झाल्याने संबंधित प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यास मंजुरी दिली आहे; यानुसार ही सेवा आता दैनिक गाडीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. नव्या निर्देशानुसार, गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस जी सध्या उधना येथून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटते, ती आता दररोज सकाळी ७.१० वाजता उधना येथून सुटेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस जी सध्या ब्रह्मपूर येथून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सुटते, ती देखील आता दररोज रात्री ११.४५ वाजता ब्रह्मपूर येथून सुटेल.

ही गाडी नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ आणि नागपूर मार्गे धावत असल्याने खान्देश आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणी मिळाली आहे. केवळ कामगारच नव्हे, तर विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

असे आहे दोन्ही बाजूचे वेळापत्रक

१९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस उधना येथून दररोज सकाळी ७.१० वाजता सुटल्यानंतर वाटेत नवापूर स्थानकावर ८.२८ वाजता, नंदुरबार स्थानकावर ९.३५ वाजता, दोंडाईचा स्थानकावर १०.०३ वाजता, शिंदखेडा स्थानकावर १०.२३ वाजता, अमळनेर स्थानकावर ११.०३ वाजता, धरणगाव स्थानकावर ११.३८ वाजता, जळगाव स्थानकावर दुपारी १२.३२ आणि भुसावळ स्थानकावर दुपारी १ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल. त्याचप्रमाणे १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ब्रम्हपूर येथून दररोज रात्री ११.४५ वाजता सुटल्यानंतर वाटेत भुसावळ स्थानकावर तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता, जळगाव स्थानकावर २.३८ वाजता, धरणगाव स्थानकावर ३.३० वाजता, अमळनेर स्थानकावर ३.४८ वाजता, शिंदखेडा स्थानकावर ४.२३ वाजता, दोंडाईचा स्थानकावर ४.४३ वाजता, नंदुरबार स्थानकावर ५.२५ वाजता आणि नवापूर स्थानकावर सकाळी ६.२६ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल.

२२ पैकी तब्बल ११ डबे जनरल

१९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला एकूण २२ डबे जोडले जातील. आणि त्यापैकी तब्बल ११ डबे हे जनरल म्हणजेच सर्वसाधारण स्वरुपाचे असणार आहेत. याशिवाय ८ शयनयान आणि २ डबे अपंगांसाठी राखीव असतील. लांबपल्ल्याच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांसाठी १ पॅन्ट्री कार देखील एक्स्प्रेससोबत असणार आहे.

दरम्यान, तब्बल ११ जनरल डबे असलेल्या प्रवाशांना त्यातून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांमधील नेहमीची गर्दी लक्षात घेता खान्देशातील प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे. या गाडीसाठी धरणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता.