जळगाव : गुजरात आणि ओडिशा या दोन राज्यांना जोडणाऱ्या उधना–ब्रह्मपूर अमृत भारत  एक्स्प्रेसबाबत पश्चिम रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली असून, ही गाडी आता आठवड्याचे सर्व दिवस नियमितपणे धावणार आहे. यापूर्वी ही गाडी सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस, नंतर तीन दिवस चालवली जात होती. मात्र, प्रवाशांकडून मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि मागणीचा विचार करून आता ती दररोज चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेच्या या निर्णयामुळे विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील खान्देश विभागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील हजारो प्रवासी, कामगार मोठ्या प्रमाणावर सुरत आणि आसपासच्या औद्योगिक भागात कामासाठी जातात. त्यांच्यासाठी सुरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस दररोज सुरू झाल्याने या प्रवाशांना आता नियमित आणि विश्वासार्ह रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

ही गाडी नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ आणि नागपूर मार्गे धावत असल्याने खान्देश आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणी मिळाली आहे. त्यामुळे केवळ कामगारच नव्हे, तर विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबीय प्रवास करणाऱ्यांनाही या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही गाडी एक सोयीस्कर पर्याय ठरत आहे.

अमृत भारत एक्सप्रेस ही संकल्पना भारतीय रेल्वेकडून सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या गाडीत आधुनिक आसनव्यवस्था, सुधारित स्लीपर व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर काही आधुनिक सुविधा या गाडीतही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र प्रवास भाडे नियंत्रित ठेवण्यात आले आहे, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांनाही या सुविधांचा लाभ घेता येईल. पश्चिम रेल्वेने या गाडीला सामाजिक-आर्थिक समावेशाचे प्रतीक संबोधले असून, देशातील विविध भागांतील लोकांना जोडण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या प्रवासाची संधी देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस दररोज धावू लागल्याने प्रतीक्षा यादीत घट होऊन प्रवास अधिक नियोजनबद्ध आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, धरणगाव प्रवासी मंडळाने या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार स्मिता वाघ यांचे आभार मानले आहे. 

असे आहे सुधारित नियोजन

रेल्वे मंडळाने जारी केलेल्या एका अधिकृत पत्रकानुसार, रेल्वे मंत्रालयाने १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यास मंजुरी दिली आहे; यानुसार ही सेवा आता आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या गाडीवरून ‘दैनिक’ (रोज धावणारी) गाडीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. नव्या निर्देशानुसार, गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस जी सध्या उधना येथून रविवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सुटते, ती आता दररोज धावेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस जी सध्या ब्रह्मपूर येथून सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सुटते, ती देखील आता दररोज चालवली जाईल.