Western Railway Special Trains 2026: लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने उधना ते चरलापल्ली दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे गाडी चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील हजारो प्रवाशांना थेट, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण, व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०७५०९ उधना–चरलापल्ली विशेष साप्ताहिक गाडी सहा ते २० फेब्रुवारी या कालावधीत धावणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी उधना स्थानकावरून रात्री १०.४५ वाजता सुटेल आणि सुमारे २० तासांचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०७.०० वाजता चरलापल्ली स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे, परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०७५०८ चरलापल्ली–उधना विशेष साप्ताहिक गाडी पाच ते १९ फेब्रुवारी या कालावधीत दर गुरुवारी चरलापल्ली स्थानकावरून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०८.३० वाजता उधना स्थानकावर दाखल होईल.
या दोन्ही विशेष गाड्यांना मार्गातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले असून, विशेष गाड्या नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामारेड्डी आणि मेदचल या स्थानकांवर थांबणार आहेत. या थांब्यांमुळे खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत प्रवाशांच्या विविध गरजा लक्षात घेण्यात आल्या असून त्यामध्ये एसी २ टियर, एसी ३ टियर, शयनयान तसेच द्वितीय सर्वसाधारण डब्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील प्रवाशांपासून ते वातानुकूलित सुविधांची अपेक्षा असणाऱ्या प्रवाशांपर्यंत सर्वांनाच या गाडीचा लाभ घेता येणार आहे. मात्र, या गाड्या विशेष स्वरूपाच्या असल्याने त्यामधून प्रवास करताना नियमित गाड्यांच्या तुलनेत वेगळे आणि विशेष भाडे आकारले जाईल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गाडी क्रमांक ०७५०९ साठी आरक्षण पाच फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. प्रवासी सर्व पीआरएस काउंटरवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन आरक्षण करू शकतात. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे थांबे, आगमन-प्रस्थान वेळा, डब्यांची रचना तसेच भाड्याची माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे. पश्चिम रेल्वेने सुरू केलेली ही विशेष साप्ताहिक गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी उचललेले आणखी एक सकारात्मक पाऊल मानले जात असून, यामुळे आगामी काळात प्रवाशांची गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.

