जळगाव : उन्हाळी सुट्ट्यांमुळे देशभरातील रेल्वे मार्गांवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–जयनगर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांना जोडणाऱ्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. खान्देशातही काही स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ०९०६१ क्रमांकाची उधना–जयनगर अनारक्षित विशेष गाडी ०५ ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी उधना स्थानकाहून पहाटे ०१.३० वाजता सुटेल आणि जवळपास ३७ तासांचा प्रवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.३० वाजता जयनगर येथे पोहोचेल. लांब पल्ल्याच्या या गाडीमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना अनारक्षित प्रवासाचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे, ०९०६२ क्रमांकाची जयनगर–उधना अनारक्षित विशेष गाडी ०६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत दर सोमवारी धावणार आहे. ही गाडी जयनगरहून दुपारी ०५.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१५ वाजता उधना येथे दाखल होईल.
या स्थानकांवर असेल थांबा
या दोन्ही गाड्यांमुळे प्रवाशांना दोन्ही दिशांनी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, मार्गातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे विविध राज्यांतील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. उन्हाळ्यात स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि खासगी कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर प्रवास वाढतो. नियमित गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण होत असल्याने अनारक्षित डब्यांची मागणी वाढते. हीच बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–जयनगर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्यांची योजना आखली आहे.
जळगावला थांबा नसल्याने नाराजी
विशेषतः कमी खर्चात तातडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रकाची माहिती आधीच तपासून घ्यावी, तसेच गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन केले आहे. या विशेष गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून गरज भासल्यास पुढील काळात अशा अतिरिक्त गाड्यांची संख्या वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या चालवताना जळगाव सारख्या मोठ्या जंक्शन स्थानकावर थांबा दिला जात नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगावमार्गे धावणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
