जळगाव : पश्चिम रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन उधना ते मधुबनी दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरेल. विशेषतः स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उधना–मधुबनी विशेष गाडी क्रमांक ०९१५१ ही १ मेपासून २६ जूनपर्यंतच्या कालावधीत धावणार आहे. ही गाडी बुधवार आणि शुक्रवार या दिवशी उधना स्थानकावरून सकाळी ०८:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २१:०० वाजता मधुबनी येथे पोहोचेल. प्रवासाचा कालावधी साधारणतः ३६ तासांपेक्षा अधिक असणार आहे. परतीच्या दिशेने मधुबनी–उधना ०९१५२ ही विशेष गाडी २ मेपासून २७ जूनपर्यंतच्या या कालावधीत दर गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. ही गाडी मधुबनी येथून रात्री ११:०० वाजता सुटून शनिवारी आणि सोमवारी दुपारी ०२:०० वाजता उधना येथे पोहोचेल.
आरक्षणाची आवश्यकता नाही
नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, मिर्झापूर, पंडित दिनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटणा, फातुहा, बख्तीयार, मोकामा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा आणि साकरी आदी स्थानकांचा समावेश विशेष गाडीच्या मार्गात करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील विविध शहरांतील प्रवाशांना थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित (जनरल) स्वरूपाची असल्याने प्रवाशांना कोणत्याही आरक्षणाची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे अचानक प्रवास करणाऱ्या किंवा तातडीच्या कारणांसाठी निघणाऱ्या प्रवाशांना याचा विशेष फायदा होणार आहे. मात्र, अनारक्षित गाडी असल्याने गर्दीची शक्यता लक्षात घेऊन प्रवाशांनी वेळेपूर्वी स्टेशनवर पोहोचण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वेचे प्रवाशांना हे आवाहन
उन्हाळी हंगामात विशेषतः उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि अतिरिक्त प्रवासी वाहतुकीचा भार सांभाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची पर्यायी सुविधा ठरणार असून, दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या रेल्वे चौकशी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रवासादरम्यान नियमांचे पालन करावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
