जळगाव : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना (गुजरात) ते मालदा टाउन (पश्चिम बंगाल) दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खान्देशातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहारमार्गे पूर्व भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ०९०३३ उधना–मालदा टाउन साप्ताहिक विशेष ही विशेष गाडी ०४ एप्रिल ते २३ जुलै २०२६ या कालावधीत दर गुरुवारी धावेल. ही गाडी उधना स्थानकावरून रात्री ११:०० वाजता सुटून दोन दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी सकाळी ११:०० वाजता मालदा टाउन येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने ०९०३४ मालदा टाउन–उधना साप्ताहिक विशेष ही गाडी १२ एप्रिल ते २६ जुलै २०२६ या कालावधीत दर रविवारी धावेल. ही गाडी मालदा टाउन येथून सकाळी ९:३० वाजता सुटून मंगळवारी पहाटे ०१:२० वाजता उधना येथे पोहचणार आहे.

या विशेष गाडीचे थांबे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किऊल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, आदी स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे विविध राज्यांतील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.

प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी गाडीत एसी ३-टियर, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ०९०३३ या गाडीसाठी आरक्षण सोमवारपासून सुरू होत आहे. प्रवाशांनी वेळेत तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. आरक्षण व इतर तपशीलांसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचेही सांगण्यात आले आहे.

उन्हाळ्यातील सुट्ट्यांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मोठा ताण येतो. नियमित गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी वाढत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या चालवून अतिरिक्त प्रवासी वाहतूक क्षमता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही विशेष सेवा सुरू झाल्यामुळे पूर्व भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित व सुलभ होणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

उधना–जयनगर अनारक्षित गाड्या

पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी उधना आणि जयनगर दरम्यान देखील अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. ०९०६१ उधना–जयनगर ही अनारक्षित विशेष गाडी ०५ ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत आठवड्यातून एक दिवस रविवारी उधनाहून पहाटे ०१.३० वाजता सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.३० वाजता पोहचेल.

याशिवाय, ०९०६२ जयनगर–उधना ही अनारक्षित विशेष गाडी ०६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत आठवड्यातून एक दिवस सोमवारी दुपारी ०५.३० वाजता जयनगरहून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१५ वाजता उधना येथे पोहचेल. दोन्ही गाड्यांना चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आदी स्थानकांवर थांबा असेल.