जळगाव : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उधना–पंढरपूर–मिरज मार्गावर विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गाडीला यंदा जळगाव जिल्ह्यात आणखी एक वाढीव अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक, वारकरी तसेच सर्वसामान्य प्रवाशांचा पंढरपूरच्या वारीचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.

२१ मे रोजी मुंबई सेंट्रल येथे झालेल्या विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्य महेंद्र कोठारी यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त उधना–मिरज–पंढरपूर विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी केली होती. वाढती प्रवासी संख्या, वारकऱ्यांची गैरसोय आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या अतिरिक्त गर्दीचा विचार करून ही मागणी करण्यात आली होती. याचबरोबर खासदार स्मिता वाघ यांनीही पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत ही विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.

रेल्वे प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार, ०९०७१ उधना–मिरज विशेष गाडी २३ आणि २४ जुलै रोजी उधना येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०० वाजता पंढरपूर येथे पोहचल्यानंतर सकाळी ७.३० वाजता ती मिरज येथे दाखल होईल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०७२ मिरज–उधना विशेष ही गाडी २४ आणि २५ जुलै रोजी सकाळी ८.४० वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५० वाजता उधना येथे पोहचणार आहे.

याठिकाणी असेल वाढीव थांबा

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा रेल्वे प्रशासनाने उधना–मिरज विशेष रेल्वे गाडीला यंदा धरणगाव तालुक्यातील पाळधी स्थानकावरील थांब्याला मंजूरी दिली आहे. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. खान्देशातील जळगाव, धरणगाव, पाळधी तसेच परिसरातील अनेक भाविक दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. मात्र नियमित रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

विशेष रेल्वे उपलब्ध झाल्यामुळे या अतिरिक्त गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, वारकऱ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि नियोजनबद्ध प्रवासाची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे, पाळधी स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांना जळगाव किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन रेल्वे पकडण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वेळ, खर्च आणि प्रवासातील अतिरिक्त त्रास वाचणार असून, ग्रामीण भागातील प्रवाशांनाही रेल्वे सेवेचा थेट लाभ मिळणार आहे. हा थांबा मंजूर झाल्याने पाळधी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

प्रवासी मंडळाने मानले आभार

उधना–पंढरपूर–मिरज विशेष रेल्वेच्या एकूण दोन फेऱ्या होणार असून, आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीचा विचार करून या गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. या विशेष सेवेचा लाभ मोठ्या संख्येने वारकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवासी घेऊ शकणार आहेत. दरम्यान, धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने या निर्णयाबद्दल जळगावच्या खासदार स्मिता वाघ, विभागीय रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य महेंद्र कोठारी, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच संबंधित सर्व रेल्वे अधिकारी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या या विशेष रेल्वेगाडीचा जास्तीत जास्त वारकरी, भाविक आणि प्रवाशांनी लाभ घ्यावा, तसेच प्रवासाचे नियोजन वेळेत करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन धरणगाव तालुका प्रवासी मंडळातर्फे करण्यात आले आहे.