जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वाढती गर्दी आणि नियमित रेल्वे गाड्यांमधील आरक्षणाचा ताण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांना नंदुरबार, अमळनेर, जळगाव, पाचोरा आणि चाळीसगावसह खान्देशातील प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने भाविकांसह सर्वसामान्य प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. आषाढी वारीसाठी दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने भुसावळसह विविध स्थानकांहून पंढरपूर आणि मिरजसाठी विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानंतर पश्चिम रेल्वेनेही प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन उधना–मिरज मार्गावर विशेष गाडीच्या चार फेऱ्यांची घोषणा केली आहे. गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना या गाडीचा थेट लाभ मिळणार असून, पंढरपूरचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०७१ उधना–मिरज विशेष ही गाडी २३ आणि २४ जुलै रोजी उधना येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०० वाजता पंढरपूर येथे पोहचल्यानंतर सकाळी ७.३० वाजता ती मिरज येथे दाखल होईल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०७२ मिरज–उधना विशेष ही गाडी २४ आणि २५ जुलै रोजी सकाळी ८.४० वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५० वाजता उधना येथे पोहचणार आहे. ही विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

वाटेत या स्थानकांवर असेल थांबा

सुमारे १,००१ किलोमीटरचा प्रवास २३ ते २४ तासांत पूर्ण करणाऱ्या या विशेष गाडीला दोन्ही दिशेने चलथान, बारडोली, व्यारा, उकई सोनगड, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डूवाडी आणि पंढरपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांना अन्यत्र जाऊन गाडी पकडण्याची गरज भासणार नाही. दरवर्षी आषाढी एकादशीच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अनेक वारकऱ्यांना वेळेत आरक्षण मिळत नसल्याने उभ्याने प्रवास करावा लागतो किंवा खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो. या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांची मागणी सातत्याने होत होती. यंदा चार विशेष फेऱ्या जाहीर झाल्याने वारकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी

गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेने या मार्गावर दोन विशेष फेऱ्या चालवल्या होत्या. त्या गाड्यांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला होता. अनेक गाड्यांमधील प्रतीक्षा यादी शेकड्यांमध्ये पोहोचल्याने विशेष गाड्यांनाही मोठी मागणी होती. या अनुभवाच्या आधारे यंदा चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उधना–पंढरपूर–मिरज मार्गावर किमान पाच ते सात विशेष फेऱ्या चालविण्याची मागणी करण्यात आली होती. खान्देश, दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आणखी गाड्यांची घोषणा करावी, अशी अपेक्षा समिती सदस्यांसह विविध वारकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. विशेष गाड्यांच्या आरक्षणासंदर्भातील माहिती रेल्वेच्या अधिकृत आरक्षण केंद्रांवर तसेच ऑनलाइन आरक्षण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.