जळगाव : मुंबई सेंट्रल विभाग येथे नुकतीच विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची (डीआरयुसीसी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तापी सेक्शनमधील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, धरणगाव रेल्वे स्थानकावरील प्रलंबित विकासकामे, प्रवासी सुविधा तसेच नव्या रेल्वे गाड्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. डीआरयुसीसीचे सदस्य महेंद्र एस. कोठारी यांनी प्रवाशांच्या अनेक अडचणी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रासह गुजरातमधून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पश्चिम रेल्वेच्या तापी सेक्शनमधूनही मोठ्या प्रमाणावर वारकरी प्रवास करत असल्याने यंदाच्या वारी कालावधीत उधना–पंढरपूर–मिरज वारी विशेष गाडीच्या पाच ते सात फेऱ्या चालविण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. विशेषतः १ ते ३० जुलै या कालावधीत या गाड्या सुरू केल्यास वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगण्यात आले.
मागील वर्षी पश्चिम रेल्वेने या मार्गावर दोन विशेष फेऱ्या चालवल्या होत्या. आणि त्या गाड्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता. अनेक वारकऱ्यांना नियमित गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यंदा अधिक फेऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यामुळे केवळ वारकऱ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य प्रवाशांनाही अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार असल्याचे नमूद करण्यात आले.
धरणगाव रेल्वे स्थानकाच्या वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सुरक्षिततेचा मुद्दाही बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. स्थानकाच्या पुढील बाजूस ४ मीटर किंवा ६ मीटर रुंदीचा नवीन फूट ओव्हर ब्रिज उभारण्याची मागणी करण्यात आली. सध्या अनेक प्रवासी फलाट बदलण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅक ओलांडतात, ज्यामुळे अपघाताचा धोका सातत्याने वाढत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने नवीन फूट ओव्हर ब्रिज उभारणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले. धरणगाव स्थानक हे तापी सेक्शनमधील महत्त्वाचे स्टेशन असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आधुनिक सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
याचबरोबर धरणगाव स्टेशनवर सीसीटीव्ही सुरक्षा कॅमेरे बसविण्याची मागणीही करण्यात आली. स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक निगराणी यंत्रणा असणे आवश्यक असून चोरी, गैरप्रकार तसेच संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ट्रेन कोच डिजिटल इंडिकेटरचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. हे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना डिजिटल माहिती सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. डिजिटल इंडिकेटरमुळे गाडीच्या कोचची अचूक माहिती मिळाल्याने प्रवाशांची धावपळ कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
बैठकीत १९१०५/०६ उधना–भुसावळ मेमू गाडीबाबतही गंभीर चर्चा झाली. सध्या ही गाडी मेमू रेकसह धावत असून त्यामध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व रात्रीच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गाडीला आयसीएफ रेक व स्लीपर कोच जोडून नियमित एक्स्प्रेस स्वरूपात चालविण्याची मागणी करण्यात आली. १९०२१/२२ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस संदर्भातही महत्त्वाची मागणी करण्यात आली.
रेल्वे बोर्डाने या गाडीला दैनिक चालविण्याची मंजुरी दिलेली असतानाही सध्या ही गाडी आठवड्यात केवळ तीन दिवस चालवली जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात आले. ०६१८१/८२ कोयंबतूर–जयपूर विशेष तसेच २०६२५/२६ चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्सप्रेसलाही धरणगाव येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडण्यात आलेल्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
