जळगाव : खान्देशमार्गे उधना ते पुणे नवी रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मुंबईत पश्चिम रेल्वेच्या झेडआरयूसीसीच्या बैठकीतही त्यावर चर्चा झाली आहे. दरम्यान, उधना–पुणे रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच या गाडीच्या पाठपुराव्याचे श्रेय घेण्यावरून खान्देशात विविध लोकप्रतिनिधींमध्ये मोठी चढाओढ सुरु झाली आहे. काहींनी तर रेल्वे मार्गातील संभाव्य थांब्याची यादीच सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन टाकली आहे.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्यासमोर झेडआरयूसीसी सदस्य प्रतीक जैन यांनी उधना–पुणे रेल्वेसेवेसह खान्देशातील इतर प्रलंबित मागण्यांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, उधना–पुणे दरम्यान नवी अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्तरावर मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच रेल्वे बोर्डासमोर रितसर प्रस्ताव दाखल करुन गाडी क्रमांक आणि अंतिम परिचालन वेळापत्रक निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही म्हटले गेले आहे. उपलब्ध माहितीनुसार प्रस्तावित गाडी उधना येथून सुटून नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाइनमार्गे पुण्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमधील उधना–सुरत परिसराला खान्देश आणि पुण्याशी थेट जोडणी मिळू शकणार आहे.
नंदुरबार, धुळे, जळगावला मोठा फायदा
खान्देशातील नंदुरबारसह धुळे, आणि जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पुणे हे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय सेवांसाठी महत्त्वाचे शहर आहे. सध्या या भागातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने गाडी बदलण्याची किंवा अन्य मार्गांचा वापर करण्याची वेळ येते. त्यामुळे उधना–पुणे थेट रेल्वे सेवेची मागणी सातत्याने होत आहे. नवी रेल्वे सेवा सुरू झाल्यास नंदुरबार, धुळे आणि जळगावातील प्रवाशांना पुण्याकडे जाण्यासाठी अधिक सोयीचा रेल्वे पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना याचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.
थांब्यांबाबत विविध माहितीत फरक
पश्चिम रेल्वेच्या बैठकीनुसार नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि मनमाड या मार्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर खान्देशातील लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टनुसार नंदुरबारनंतर अमळनेर, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड असे संभाव्य थांबे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदखेडा, दोंडाईचा, धरणगाव, पाचोरा यांसारख्या स्थानकांना या प्रस्तावित गाडीचा नियमित थांबा मिळणार आहे किंवा नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक उधना ते पुणे रेल्वेच्या थांब्यांची माहिती अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
खान्देशातील इतर मागण्यांचीही चर्चा
झेडआरयूसीसीच्या बैठकीत केवळ उधना–पुणे रेल्वेचा मुद्दा नव्हता. खान्देशातील इतर रेल्वे सुविधांबाबतही मागण्या मांडण्यात आल्या. भुसावळ–नंदुरबार एक्स्प्रेसचा विस्तार सुरतपर्यंत करणे, खान्देश एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडणे, भुसावळ–दादर एक्स्प्रेस कायमस्वरूपी सुरू ठेवणे, तसेच काही एक्स्प्रेसना धरणगाव आणि अमळनेर येथे थांबा देण्याच्या मागण्या बैठकीत करण्यात आल्या. धरणगाव आणि अमळनेर स्थानकांच्या विकासासह प्रवासी सुविधा, स्वच्छता, पादचारी पूल, स्थानक परिसराचा विकास, मालधक्का आणि आरपीएफच्या बाह्य चौकीसंदर्भातील मागण्याही मांडण्यात आल्या.
