जळगाव : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना ते सुभेदारगंज दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे ही विशेष गाडी सुरू करण्यात आली असून गुजरातसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनाही प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०४१५६ उधना–सुभेदारगंज विशेष ही गाडी १० मार्च ते ३१ मार्च या कालावधीत उधना स्थानकावरून प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता सुटणार आहे. ही गाडी मार्गातील विविध स्थानकांवर थांबे घेत दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता सुभेदारगंज येथे पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी ०४१५५ सुभेदारगंज–उधना विशेष ही गाडी ९ मार्च ते ३० मार्च या कालावधीत सुभेदारगंज स्थानकावरून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.४० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता उधना येथे पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमुळे गुजरात ते उत्तर प्रदेश या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
जळगावमधील तीन थांब्यांचा समावेश
दोन्ही विशेष रेल्वे गाड्यांना मार्गातील व्यारा, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, वीरांगना लक्ष्मीबाई झांशी, ओराई, पोखरण, गोविंदपुरी आणि फतेहपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी विशेषतः अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ या स्थानकांवरील थांबा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना गुजरात तसेच थेट उत्तर प्रदेशकडे जाण्यासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या विशेष गाडीत एसी ३ टियर, स्लीपर क्लास तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांना त्यांच्या सोयीप्रमाणे प्रवास करता येणार आहे.
शुक्रवारपासून आरक्षण सुरु
सुट्ट्यांचा हंगाम, धार्मिक यात्रेसाठी जाणारे भाविक तसेच नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. ०४१५६ या विशेष गाडीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच रेल्वेच्या अधिकृत आरक्षण काउंटरवर ६ मार्चपासून सुरू झाले आहे. दोन्ही दिशेने धावणाऱ्या या गाड्यांसाठी विशेष प्रवास भाडे लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करून आगाऊ तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांना गाडीचे अचूक वेळापत्रक, थांबे तसेच इतर माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. या विशेष गाडीमुळे जळगाव जिल्ह्यासह खानदेश परिसरातील प्रवाशांना उत्तर भारताकडे जाण्यासाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.
