जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उधना ते पुणे व्हाया नंदुरबार, अमळनेर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड या प्रस्तावित रेल्वे गाडीचा मुद्दा मध्य रेल्वेच्या बैठकीत बुधवारी पुन्हा ऐरणीवर आला. जळगाव लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याने या मार्गावर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत खासदार स्मिता उदय वाघ यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठामपणे मागणी मांडली.

नागपूर येथे बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांची बैठक झाली. या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग आणि भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल उपस्थित होते.

बैठकीत विविध मतदारसंघांतील रेल्वे विकासकामे आणि प्रवाशांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांचा सविस्तर आढावा घेताना उधना ते पुणे व्हाया नंदुरबार, अमळनेर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि मनमाड या मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर विशेष भर दिला.

उत्तर महाराष्ट्र पुण्याशी जोडण्याची गरज

नंदुरबार, धुळे, जळगाव आणि पुणे या दरम्यान शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो. मात्र, या भागातील प्रवाशांना अनेकदा रेल्वे बदलावी लागते किंवा उपलब्ध मर्यादित सेवांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उधना ते पुणे व्हाया नंदुरबार, अमळनेर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड अशी थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. विशेषतः नंदुरबार, अमळनेर परिसरातील प्रवाशांसाठी पुण्याशी थेट रेल्वे जोडणी उपलब्ध होणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाकडे केवळ नवीन रेल्वे गाडी म्हणून नव्हे, तर उत्तर महाराष्ट्राच्या प्रवासी वाहतुकीला नवी दिशा देणारा महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

उधना–पुणे गाडीला इंजिन बदलाचा अडथळा

दरम्यान, उधना ते पुणे नवीन गाडी सुरू करण्याच्या प्रस्तावासमोर असलेल्या तांत्रिक अडचणींचाही बैठकीत विचार करण्यात आला. उधना ते पुणे गाडी चालविताना जळगाव येथे इंजिन बदलण्याची समस्या निर्माण होत असल्याने तिच्या संचालनाबाबत अडचणी येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर अमृत भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून या मार्गाचा विचार करता येईल का, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे प्रस्तावित रेल्वे सेवेचा मार्ग, गाडीचे स्वरूप आणि संचालनाची पद्धत याबाबत रेल्वे प्रशासनाकडून व्यवहार्य पर्याय तपासले जाण्याची शक्यता आहे. संबंधित विषयावर सकारात्मक कार्यवाही करून निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जळगावच्या रेल्वे विकासावरही चर्चा

बैठकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सर्व स्थानकांच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्थानक पुनर्विकास, अमृत भारत स्थानक योजना, प्रलंबित कामे, स्थानकांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांवरही चर्चा झाली. नवीन रेल्वे गाड्यांना थांबा देणे तसेच पूर्वीचे महत्त्वाचे थांबे नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणीही खासदार वाघ यांनी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुविधा वाढविण्याची गरज त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.