जळगाव : भारतीय रेल्वेने २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात डानकुनी–सुरत समर्पित माल वाहतूक कॉरिडॉरची (डीएफसी) घोषणा केली आहे. सुमारे २,१०० किलोमीटर लांबीचा हा स्वतंत्र रेल्वे मार्ग उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून जाणार असल्याने त्यासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणात नव्याने भूसंपादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समर्पित माल वाहतूक कॉरिडॉर प्रकल्प पूर्व भारतातील डानकुनीपासून पश्चिमेकडील सुरतपर्यंत विस्तारला जाणार आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात या सहा राज्यांतून जाणारा हा मार्ग उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक व लॉजिस्टिक क्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणेल. डानकुनी ते सुरत दरम्यानचा हा अत्याधुनिक रेल्वे मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. त्यासाठी नवीन मार्ग तयार करण्याचे ठरल्यास मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या गुजरात आणि पश्चिम बंगाल दरम्यानच्या बहुतांश रेल्वे मार्गांवर प्रवासी आणि मालगाड्या एकाच रुळावरुन धावतात. त्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडणे, विलंब, गाड्यांची प्रतीक्षा आणि क्षमतेवरील मर्यादा, अशा समस्या सातत्याने निर्माण होतात. मालगाड्यांची गती तुलनेने कमी असल्याने प्रवासी गाड्यांवर त्याचा परिणाम होतो. नवीन समर्पित माल वाहतूक कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणातील माल वाहतूक त्या मार्गावर हलवली जाईल. परिणामी, विद्यमान रेल्वे मार्गावर प्रवासी गाड्यांना अधिक वेळ आणि प्राधान्य उपलब्ध होईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना अधिक वक्तशीर सेवा मिळण्याची शक्यता वाढेल.
कोळसा, अन्नधान्य वाहतुकीला गती
जाणकारांच्या मते, नियमित रेल्वे मार्गावरील गर्दी कमी झाल्यामुळे सिग्नलिंग व्यवस्थेवरील ताण घटेल तसेच अपघातांचा धोका कमी होईल. प्रवासी गाड्यांना स्थिर गतीने धावता येईल, त्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होऊ शकतो. याशिवाय देखभाल आणि दुरुस्तीची कामेही अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येतील. डानकुनी–सुरत कॉरिडॉर पूर्व आणि पश्चिम भारतातील औद्योगिक क्लस्टर्सना थेट जोडेल. विशेषतः गुजरातमधील कापड, हिरे व रसायन उद्योग आणि पूर्वेकडील खनिज व ऊर्जा क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे. बंदरांपर्यंत माल पोहोचविण्याचा कालावधी कमी झाल्यास निर्यात स्पर्धात्मकतेत वाढ होईल. पूर्व भारतातील औद्योगिक पट्टा आणि पश्चिमेकडील उत्पादन व निर्यात केंद्रांना जोडणारा हा कॉरिडॉर देशातील माल वाहतुकीची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. देशातील औद्योगिक साखळी अधिक सक्षम करण्यासाठी तो महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे कोळसा, पोलाद, सिमेंट, अन्नधान्य तसेच निर्यात मालाची जलद आणि सुरक्षित वाहतूक शक्य होणार आहे.
प्रवासी रेल्वे सेवांमध्ये सुधारणा
तसेच, लॉजिस्टिक्स खर्चात घट होण्याची अपेक्षा आहे. सध्या भारतातील लॉजिस्टिक्स खर्च सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत जास्त असल्याचे मानले जाते. समर्पित मालवाहतूक मार्गांमुळे वाहतूक वेळ, इंधन खर्च आणि अडथळे कमी होऊन उद्योगांना आर्थिक लाभ मिळू शकतो. हा कॉरिडॉर देशातील विद्यमान समर्पित माल वाहतूक जाळ्याचा विस्तार मानला जात आहे. रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करून देशाला जागतिक पुरवठा साखळीत अधिक मजबूत स्थान मिळवून देणे हा या प्रकल्पामागील व्यापक उद्देश आहे. एकूणच, डानकुनी–सुरत डीएफसी केवळ माल वाहतुकीचा वेग वाढवणारा प्रकल्प नसून, गुजरात आणि पश्चिम बंगाल या दरम्यानच्या प्रवासी रेल्वे सेवांमध्ये सुधारणा घडवून आणणारा आणि उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा महत्त्वाकांक्षी टप्पा ठरणार आहे.

