नाशिक – शहरातील रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्यावतीने शनिवारी सायंकाळी पुरस्कार वितरण आणि गोदा जन्मोत्सवानिमित्त ११११ महिलांकडून गोदा आरती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, गोदा काठावरील पटांगणात छोट्या विक्रेत्यांना व्यवसायास प्रतिबंध केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. समितीचा कार्यक्रम शनिवारी असताना चार दिवस आधीच विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली गेली, यामुळे हातावर पोट असणाऱ्यांंवर अन्याय झाल्याची तक्रार होत आहे. सेवा समितीने हे आक्षेप तथ्यहीन ठरवले. हा विषय मनपा प्रशासनाचा असून अतिक्रमित जागेत संंबंधितांकडून व्यवसाय होत असल्याकडे लक्ष वेधले.

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने पहिल्या रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कारासाठी कर्नाटकच्या धारवाड येथील वेदमूर्ती पं. राजेश्वर शास्त्री जोशी यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी रामतीर्थ गंगाघाट येथे या पुरस्काराचे वितरण केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, शांता कुमारी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सहकार्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे समितीने म्हटले आहे एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच सोहळ्यात रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्काराने ज्येष्ठ कृषितज्ज्ञ सुभाष शर्मा यांना सन्मानित केले जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गोदा काठावरील व्यावसायिकांना चार दिवस आधीच भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. पालिका पथकाने टपरीधारकांच्या टपऱ्या काढण्याची सूचना केल्यामुळे छोट्या विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. मागील काही पिढ्यांपासून आम्ही येथे व्यवसाय करतो. कार्यक्रमास चार दिवस असताना आमचे व्यवसाय बंद करण्यात आले. एक ते दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या गोदा आरतीमुळे छोट्या विक्रेत्यांना त्रास होत आहे. महिन्याला आम्ही पालिकेला पैसे भरतो. आरतीसाठी आम्हाला येथून काढण्याचा कट रचला जात असल्याची तक्रार काहींनी केली. कुंभमेळ्यात आम्ही टपऱ्या काढून सहकार्याची भूमिका घेतो. व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाह कसा करणार, असा प्रश्न काहींनी केला. सकाळी दुकान लावले तर, सायंकाळी घरची चूल पेटते. समितीने याचा विचार करावा, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

मुळात गोदा काठावरील अतिक्रमित फेरीवाल्यांवरील कारवाई हा प्रशासनाचा विषय आहे. समितीचा त्याच्याशी संबंध नाही. फेरीवाल्यांच्या व्यवसायाला समितीचा विरोध नाही. गोदा आरतीसाठी हजारो नागरिक येतात. तेव्हा किमान ये-जा करण्यासाठी जागा मोकळी राखणे अपेक्षित आहे. परिसरातील विक्रेते अतिक्रमित जागेत व्यवसाय करून हक्क सांगत आहेत. गोदा आरतीच्या सामाजिक कार्यात मदत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विक्रेत्यांच्या पोटावर पाय येईल, असे समिती काहीही करीत नाही. शनिवारचा कार्यक्रम झाल्यानंतर हा विषय सामंजस्याने सुटणे अपेक्षित आहे. विक्रेत्यांमध्ये शिस्तबद्धता येण्याची गरज असून परिसरात कचरा असतो. पर्यटक, भाविकांना त्रास सहन करावा लागतो. – जयंत गायधनी (अध्यक्ष, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती).