नाशिक – कुंभमेळ्यानिमित्त देश-विदेशातून भाविक येतील. त्यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. गर्दी व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले. कुंभ काळात भ्रमणध्वनी नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी आतापासूनच उपाय योजना कराव्यात, असेही त्यांनी सूचित केले.
केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पायाभूत सुविधा व तयारी कामकाजाची आढावा बैठक पार पडली. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे, असेही त्यांनी सूचित केले. कुंभमेळ्याचे प्रतिबिंब रामकाल पथमध्ये उमटले पाहिजे. रामकाल पथ साकारताना स्थानिक वास्तू कलेशी सुसंगत रचना करावी. रंगसंगतीच्या माध्यमातून भाविकांना रामायण काळाची माहिती होईल, असे नियोजन करावे. त्यासाठी चित्रकला शाखेच्या स्थानिक विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. कुंभमेळा नियोजनात महिला, तरुणांसह समाजातील विविध घटकांचा सहभाग घ्यावा. कुंभमेळ्यानिमित्त तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना कुंभमेळ्याचे महत्व याविषयी माहिती द्यावी, असे मंत्री शेखावत यांनी सूचित केले.
कुंभमेळ्यात भ्रमणध्वनी सुविधा सुरळीत राहण्यासाठी उपाय योजण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. रामकाल पथसह अन्य विकास कामांसाठीचा प्रस्ताव तसेच त्र्यंबकेश्वर येथील विकास कामांचा समावेश असलेला सर्वसमावेशक आराखडा सादर करावा. गर्दी व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करावे. भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. भाविकांसाठी मदतवाहिनी सुविधा कार्यान्वित करावी. नाशिकसह जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने प्रसिध्दी करावी, अशा सूचनाही केंद्रीय मंत्री शेखावत यांनी केल्या.
यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी उपस्थित होते. बैककीत अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विकास कामे, साधूग्राम, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, रामकाल पथ, भूसंपादन, बाधितांचे पुनर्वसन याविषयी सविस्तर माहिती दिली.

