जळगाव : पोलीस प्रशासनाविरोधात चाळीसगाव शहरात गेल्या रविवारी आयोजित केलेल्या जनआक्रोश धरणे आंदोलनानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह, अवमानकारक व बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच आंदोलनादरम्यान एका व्यक्तीला उद्देशून कथितरीत्या अवमानास्पद शब्दांचा वापर केल्याप्रकरणी आता त्यांच्या विरोधात स्वतंत्र अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आंदोलनातील भाषणामुळे दोन स्वतंत्र कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागल्याने पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी प्र.चा (ता. चाळीसगाव) येथील किसनराव जोर्वेकर यांच्याविरुद्ध २७ जून रोजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आवाज उठविण्यासाठी रविवारी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यासमोर जनआक्रोश धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र टीका केली. भाषणात त्यांनी विविध प्रकरणांचा उल्लेख करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाषणादरम्यान चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी देखील माजी खासदार पाटील यांनी कथितरीत्या आक्षेपार्ह, अवमानकारक व बदनामीकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तक्रारीच्या आधारे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान घडलेल्या आणखी एका घटनेमुळेही पाटील यांच्या विरोधात स्वतंत्र कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
फारुख खान उर्फ बाबा ठेकेदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांना उद्देशून शिवीगाळ केली. त्यामुळे आपली सार्वजनिक बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एनसी क्रमांक ६२६/२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५२ आणि ३५६(३) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरुद्ध एकीकडे पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून तर दुसरीकडे नगरसेवकाच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा अशा दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्याने या प्रकरणाची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे.
या घडामोडींमुळे चाळीसगावातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आंदोलनानंतर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता कायदेशीर पातळीवरही उमटू लागले आहेत. दोन्ही प्रकरणांचा तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत असून संबंधित तक्रारी, आंदोलनावेळी उपलब्ध झालेली चित्रफीत, ध्वनिचित्रफिती तसेच इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
