जळगाव : जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी तीन आठवड्यांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सोपवण्यात आली आहे. यामुळे पाटील यांचे शिवसेना शिंदे गटातील महत्व अल्पावधीतच वाढल्याचे अधोरेखित झाले असून, राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली नाही म्हणून उन्मेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. यासोबत आपले जीवलग मित्र करण पवार यांना त्यांनी ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी देखील मिळवून दिली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र पवारांचा पराभव झाला.
त्यानंतर स्वतः माजी खासदार पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत चाळीसगावमधून निवडणूक लढली. परंतु, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला. मधल्या काळात बच्चू कडू यांना बरोबर घेऊन जळगावमध्ये शेतीप्रश्नी केलेल्या आंदोलनाव्यतिरिक्त माजी खासदार पाटील ठाकरे गटाच्या व्यासपीठावर फार चमकले नाहीत. ठाकरे गटापासून अंतर राखून असतानाच अखेर त्यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, शिंदे गटातील प्रवेशावेळी उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील, असे मोठे विधान पक्षनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांच्या त्या वक्तव्यामुळे जळगावमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नव्या चर्चांनाही उधाण आले. कारण, सध्या जळगावच्या खासदार स्मिता वाघ आणि रावेरच्या खासदार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत. विशेष म्हणजे दोघी जणी भाजपकडून निवडून आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, माजी खासदार पाटील यांना शिंदे गटाकडून भविष्यात मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे भाकीत वर्तवले जात होते. प्रत्यक्षात, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशावरुन त्यांच्याकडे आता धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आपसूकच माजी खासदार पाटील हे शिंदे गटातील दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत. ज्या कारणाने त्यांचे पक्षातील महत्व वाढले आहे.
किशोर पाटील यांच्याकडेही जबाबदारी
माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या खांद्यावरही शिवसेना शिंदे गटाने अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी टाकली आहे. विशेष म्हणजे भाजपमधून शिंदे गटात काही महिन्यांपूर्वीच दाखल झालेले अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडेही नंदुरबारचे संपर्क प्रमुखपद सोपविले गेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील तिघांना एकावेळी मोठे पद शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष संघटनेत सोपविण्यात आल्याने साहजिक सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः माजी खासदार पाटील यांना मोठी संधी मिळाल्याने त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना ती चपराक मानली जात आहे.
