नाशिक: नवीन नाशिकमध्ये महापालिकेच्या नियोजनाअभावी कुठे भरपूर नळ पाणीपुरवठा होत आहे. तर, कुठे अत्यंत कमी पाणी मिळत आहे. काही ठिकाणी तर पाणीच येत नसल्याच्या तक्रारी आहेत. चेतना नगरात दोन दिवसांपासून पाण्याच्या टाक्या भरून वाहत असताना बाजूच्या परिसरात कमी दाबाने पाणी मिळत आहे.
उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती, हे महिलांसाठी कायमचे झाले असताना शहर परिसरालाही कधी नियोजनशून्यतेमुळे वेगवेगळय़ा तऱ्हा अनुभवयास मिळतात. एप्रिलपासूनच नवीन नाशिकसह अन्य भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, काही ठिकाणी पाणी येत नाही. नागरिकांना पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे पाण्याची कमी होत जाणारी पातळी लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सातत्याने होत आहे.
पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महापालिकेने दिलेला आहे. हा इशारा देणाऱ्या महापालिकेचा कारभार कसा बेभरवशी सुरू आहे, याचा अनुभव नवीन नाशिक परिसरातील चेतना नगर, राणे नगर परिसराला येत आहे. शनिवारी येथील बंगला नं. ६० जवळ असलेला व्हॉल्व्ह खराब झाला होता. व्हॉल्व्हची जोडणी मुकणे धरणातून येणाऱ्या जलवाहिनेशी संबंधित आहे. दुरुस्तीसाठी शनिवारी परिसरात पाणी बंद ठेवण्यात आले होते. नादुरुस्त व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. दुरुस्ती सुरू असताना रविवार, सोमवारी परिसरात सकाळी आठपासून सायंकाळी सहापर्यंत अखंडपणे पाणी सुरू राहिले. यामुळे परिसरातील टाक्या भरून वाहत राहिल्या. नळांना अखंडपणे पाणी सुरू असताना चेतना नगर, राणे नगराजवळील पाथर्डी फाटा, इंदिरानगरसह अन्य भागांतील पाणी पुरवठय़ावर याचा विपरीत परिणाम झाला. पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
• सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक शहरात बचतीबाबत नियोजन केले जात आहे. नागरिकांनी महापालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करावे, पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पाणी शिळे होत नाही त्यामुळे उरलेले पाणी फेकून देऊ नये.
• पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे, आंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नये, घरांवरील टाक्यांमधून पाणी बाहेर पडणार नाही, याची दक्षता घेणे, वाहने नळीचा वापर करून धुऊ नये, अंगणात अथवा रस्त्यावर सडा मारून पाण्याचा अपव्यय करू नये, नळ जोडणीला थेट मोटर किंवा पंप बसवू नये, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांना जलवाहिनी गळती, पाण्याचा अपव्यय निदर्शनास आल्यास नागरिकांनी तसे छायाचित्र आणि त्याचा सविस्तर पत्ता आणि इतर तपशील संबंधित विभागातील पाणी पुरवठा अधिकारी यांना पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारपासून पाणीपुरवठा नियमित
तांत्रिक अडचण असून मंगळवारी सायंकाळपर्यंत व्हॉल्व्हची दुरुस्ती पूर्ण होऊन मंगळवारी सकाळपासून पाणीपुरवठा नियमित होईल. – पाणीपुरवठा अधिकारी, नाशिक, पूर्व

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unplanned supply new nashik where uninterrupted tap water supply new nashik amy
First published on: 17-05-2022 at 00:09 IST