जळगाव : उत्तर भारत आणि बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना–जयनगर तसेच उधना–बरौनी दरम्यान अनारक्षित विशेष स्लीपर कोच गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर तसेच हंगामी प्रवासासाठी वाढलेल्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, खान्देशतील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
उधना–जयनगर विशेष गाडी
०९०४१ उधना–जयनगर अनारक्षित विशेष गाडी रविवारी एक मार्च रोजी सकाळी ०५.४५ वाजता उधना येथून प्रस्थान करेल. आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०६.४५ वाजता जयनगर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०९०४२ जयनगर–उधना ही सोमवारी दोन मार्च रोजी रात्री ०९.४५ वाजता जयनगरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वाजता उधना येथे आगमन करेल. संपूर्ण स्लीपर कोच डब्यांची संरचना असलेली ही गाडी दोन्ही दिशांनी चलथाण, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दिनदियाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तीयारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुबनी या स्थानकांवर थांबेल.
उधना–बरौनी विशेष गाडी
०९०५३ उधना–बरौनी अनारक्षित विशेष गाडी रविवारी एक मार्च रोजी रात्री ०८.२५ वाजता उधना येथून सुटेल. आणि तिसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे ०५.१५ वाजता बरौनी येथे पोहोचेल.परतीची गाडी क्रमांक ०९०५४ बरौनी–उधना ही सोमवारी दोन मार्च रोजी दुपारी ०२.१५ वाजता बरौनीहून सुटेल. आणि पुढील दिवशी रात्री १०.०० वाजता उधना येथे दाखल होईल. संपूर्ण स्लीपर कोच डब्यांची संरचना असलेली ही गाडी दोन्ही बाजुंनी चलथाण, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दिनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तीयारपूर आणि मोकामा स्थानकांवर थांबेल.
अनारक्षित सेवेचा प्रवाशांना लाभ
उधना–जयनगर आणि उधना–बरौनी या विशेष गाड्या स्लीपर कोचसह धावणार असल्या तरी पूर्णतः अनारक्षित (जनरल) स्वरूपाच्या असतील. त्यामुळे तिकिटे स्थानकावरील अनारक्षित तिकीट खिडकीतून किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून घेता येतील. प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी वेळेआधी स्थानकावर उपस्थित राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवास करण्याचे आवाहन केले असून फलाटावर अनावश्यक गर्दी करू नये, असेही म्हटले आहे. अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित स्थानकांशी संपर्क साधावा, असे पश्चिम रेल्वेने कळविले आहे. या निर्णयामुळे गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमार्गे बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आगामी सणासुदीच्या काळात अतिरिक्त प्रवासी गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
