मालेगाव : केंद्र सरकारच्या अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित कृषी आणि व्यापार करारावरून शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक मोडमध्ये आल्या असल्याचे चित्र आहे. या कराराला भारतीय किसान युनियनने तीव्र विरोध दर्शवला असून, शासनाने हा करार रेटण्याचा प्रयत्न केल्यास देशभरात तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी येथे दिला आहे.
भारतीय किसान युनियनच्या संघटना बांधणीसाठी टिकैत व त्यांचे सहकारी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री हे नेते मालेगावात दाखल झाले. रविवारी सकाळी या नेत्यांनी स्थानिक शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कशी बिकट होत आहे, याचे चित्र मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या या दुर्दशेला केंद्र सरकारचे चुकीची धोरणे जबाबदार आहेत,असा निशाणा साधला.
‘..तर शेतकरी उद्ध्वस्त होतील’
अमेरिकेसोबत केला जाणारा व्यापार करार थेट भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा असल्याची भीती टिकैत यांनी व्यक्त केली. जर अमेरिकेतील अनुदानित कृषी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ आणि धान्य भारतीय बाजारात सहज उपलब्ध झाले, तर आपल्या देशातील लहान आणि मध्यम शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, असा इशारा त्यांनी दिला. परदेशी स्वस्त उत्पादनांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही. अमेरिकेतील दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीमुळे भारतातील कोट्यवधी दुग्ध उत्पादकांचे भवितव्य धोक्यात येईल आणि पिकांच्या किमान आधारभूत किंमतीवर आणि सरकारी खरेदीवर देखील विपरीत परिणाम होईल,असे टिकैत म्हणाले.
देशव्यापी आंदोलन उभारणार..
अमेरिकन व्यापार करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने हा करार लागू करु नये म्हणून भारतीय किसान युनियनतर्फे केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. त्याऊपरही हा करार रेटण्याचा प्रयत्न शासनाकडून झाल्यास त्याविरोधात सनदशीर मार्गाने देश पातळीवर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा टिकैत यांनी दिला. त्यासाठी भारतीय किसान युनियनतर्फे लवकरच पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघटना बांधणीवर भर
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या राज्यातील शेतकरी आत्महत्या हा अत्यंत जटिल प्रश्न बनला आहे. शरद जोशी यांच्या काळात महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ अत्यंत जोमाने उभी राहिली होती. मात्र,कालांतराने या चळवळीचा प्रभाव ओसरल्याचे नमूद करत शेतीचे प्रश्न धसास लावण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांचे संघटन अत्यंत आवश्यक असल्याने भारतीय किसान युनियनतर्फे महाराष्ट्रात संघटना बांधणीवर भर दिला जात असल्याचे टिकैत म्हणाले. त्याचाच भाग म्हणून नंदुरबार व धुळे जिल्ह्यापासून दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. मालेगावनंतर नांदेड जिल्ह्याचा दौरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. टिकैत यांच्या समवेत या दौऱ्यात संघटनेचे महासचिव तथा जातपंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष युद्धवीर सिंह, संघटनेची महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर नलावडे-पाटील, महिला अध्यक्षा रूपालीताई पाटील हे नेते सामील झाले आहेत. याप्रसंगी बाळू वाणी, अंबुदादा निकम, शेखर पगार, अरुण पाटील, मुन्ना पवार आदी शेतकरी उपस्थित होते. दरम्यान,भारतीय किसान युनियनच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदाची धुरा प्रशांत पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
