बंदूक, तलवारी, कोयत्यांचा वापर ; पूजाविधीत गुन्हेगारीचा शिरकाव

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे पूजाविधीसाठी येणाऱ्या यजमानांच्या पळवापळवीवरून परप्रांतीय पुरोहितांच्या दोन गटात येथे झालेल्या हाणामारीने गेल्या काही वर्षांपासून चाललेला सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. त्र्यंबक नगरीत स्थानिक-बाहेरील पुरोहितांमध्ये आधीपासून वाद आहेत. त्यात परप्रांतीय पुरोहितांची भर पडली. त्यांच्या दोन गटांनी परस्परांवर प्राणघातक शस्त्रे उगारली. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

त्र्यंबकेश्वर येथे देशभरातील भाविक नारायण नागबळी, त्र्रिंपडी, काल सर्पशांती पूजा हे विधी करण्यासाठी येतात. यातील नारायण नागबळी विधी तीन दिवस चालतो. काल सर्पशांती पूजा अवघ्या काही तासात होते. पूजाविधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठी आर्थिक उलाढाल होत असून तेच संघर्षाचे कारण ठरल्याचे चित्र आहे. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ हा स्थानिकांचा तर नाशिकसह राज्यातील पुरोहितांची बहुउद्देशीय ब्राम्हण संघटना असे दोन गट कार्यरत आहेत. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी स्थानिक पुरोहितांनी त्र्यंबक नगरीत काही वर्षांपूर्वी फलकही लावले होते. पूजाविधीसाठी स्थानिकांना संघाने ओळखपत्रही दिलेले आहे. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात उभय गटात वाद झाले होते. पोलिसांना एका गटाचे फलक हटवावे लागले होते.

या दोन्ही गटात सर्व सभासद मराठी असून दोन्ही संघांनी परप्रांतीय पुरोहितांच्या वादाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचवटीतील विरेंद्र त्रिवेदी, आशिष त्रिवेदी, मनिष त्रिवेदी, सुनील तिवारी (मोकळबाबानगर, हिरावाडी), आकाश त्रिपाठी, अनिकेत तिवारी (केवडीबन), सचिन पांडे ( तपोवन) यांना अटक केली. त्यांच्या मोटारीतून गावठी बंदुक, ११ जिवंत काडतुसे यासह अन्य शस्त्र जप्त करण्यात आली. पोलीस कोठडीत असलेल्या संशयितांना बुधवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली, अशी माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी दिली.

दरम्यान, बाहेरून यजमानांना घेऊन येणारे परप्रांतीय पुरोहित त्र्यंबकेश्वर परिसरातील मठ, आश्रमांचा आधार घेतात. इंटरनेटवरून जाहिराती करतात. भाविकांना त्र्यंबक नगरीत न आणता मठ, आश्रमात पूजेचे सोपस्कार पार पाडले जातात, असे स्थानिक पुरोहितांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकमधील परप्रांतीय पुरोहितांची चौकशी करून त्यांच्याकडे काही शस्त्र आहेत का, याची छाननी करण्याची मागणी होत आहे. बहुउद्देशीय ब्राम्हण संघटनेत नाशिकसह राज्यातील मराठी पुरोहितांचा समावेश आहे. परप्रांतीय पुरोहितांच्या वादाशी दोन्ही संघांचा कुठलाही संबंध नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी सांगितले.

झाले काय?

नागपूर येथून आलेल्या यजमानाची कालसर्प पूजा कमी दक्षिणेत केल्यावरून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रारंभी वाद झाला. या वादाचे पर्यवसान दोन गटांत तणावापर्यंत गेले. नंतर नाशिक शहरात आल्यावर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या दोन गटांनी वापरलेल्या प्राणघातक शस्त्रांमुळे या हाणामारीची चर्चा राज्यभर पसरली. पोलिसांनी संशयितांकडून गावठी बंदुक, ११ काडतुसे, तलवारी, हॉकीस्टिक, कोयते, चाकू जप्त केले. तसेच सात जणांना अटक केली.

परप्रांतीय पुरोहितांमुळे त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांची नाहक बदनामी होत आहे. उपरोक्त घटनेशी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचा कुठलाही संबंध नाही. सहज पैसे मिळवण्यासाठी परप्रांतीयांकडून हे प्रकार होत आहेत. त्यांचा कल काही तासात होणाऱ्या काल सर्पशांती विधीकडे असतो. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश आहे. परप्रांतीय पुरोहितांनी पैशांसाठी भाविकांना रोखूनही धरले आहे. संबंधितांना राजकीय पाठबळ मिळते. याबाबत भाविक व त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.  – प्रशांत गायधनी,अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ