जळगाव : पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन वलसाड ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुजरात, खान्देश आणि बिहारदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या विशेष रेल्वेला खान्देशातील ठराविक तीन प्रमुख स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आला आहे. जळगावला मात्र ही गाडी थांबत नाही.
५ ऑक्टोबरपासून वाढीव फेऱ्या
गाडी क्रमांक ०९०२५ वलसाड–दानापूर विशेष रेल्वे सोमवार, ५ ऑक्टोबरपासून २३ नोव्हेंबरपर्यंत वाढीव कालावधीत धावणार आहे. ही गाडी वलसाड येथून दर सोमवारी सकाळी ८.४० वाजता सुटते. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती दानापूर स्थानकावर पोहोचते. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०२६ दानापूर–वलसाड विशेष रेल्वेला ६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर मंगळवारी दानापूर येथून दुपारी १.३० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता वलसाड येथे पोहोचते.
नंदुरबार, धरणगाव, भुसावळ थांबा
वलसाडहून दानापूरकडे जाताना विशेष रेल्वे भेस्तान, नंदुरबार, धरणगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी यांसह विविध स्थानकांवर थांबते. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांना गुजरात तसेच मध्य प्रदेश आणि बिहारकडे जाण्यासाठी या विशेष रेल्वेचा उपयोग होत असतो. नंदुरबार, धरणगाव आणि भुसावळ या तीन स्थानकांवर गाडीला दोन्ही दिशांनी थांबा असल्याने या भागातील प्रवाशांना वलसाड तसेच दानापूरकडे प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात गुजरात आणि बिहारच्या दिशेने होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या अतिरिक्त फेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. जळगावसारख्या महत्त्वाच्या जंक्शन स्थानकावर मात्र या गाडी थांबा नाही. त्यामुळे नंदुरबारहून बसलेल्या प्रवाशांना जळगाव येथे उतरण्यासाठी या गाडीचा काही एक उपयोग होत नाही.
आरक्षणाला सुरुवात
गाडी क्रमांक ०९०२५ वलसाड–दानापूर विशेष रेल्वेच्या वाढीव फेऱ्यांचे आरक्षण शनिवारपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणालीच्या (पीआरएस) केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करून आगाऊ आरक्षण करता येणार आहे. विशेष रेल्वे असल्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नियमानुसार विशेष भाडे लागू राहणार आहे. आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासादरम्यान वैध ओळखपत्राचा पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहे. गाडीचे थांबे, प्रत्येक स्थानकावरील आगमन व प्रस्थानाच्या वेळा तसेच डब्यांची संरचना याबाबतची अद्ययावत माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीच्या वेळापत्रकाची आणि उपलब्ध आरक्षणाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
