गोल्फ परिवारातर्फे सत्कार सोहळय़ात जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची भावना

नाशिक : नाशिककर तसेच क्रीडा संघटक म्हणून काम केले असल्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील अडीअडचणींची जाणीव आहे. क्रीडा विकासासाठी नाशिककरांची नेहमीच मोलाची साथ मिळाली, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले.

नाईक यांची नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी पदावरून रायगडला बदली झाल्यानिमित्त त्यांच्यासह त्यांच्या पत्नी सीमाली नाईक यांचा नाशिक जिल्हा  गोल्फ संघटना आणि गोल्फ परिवार यांच्या वतीने निफाड येथील रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नाईक बोलत होते.

गोल्फसारख्या खेळासाठी नाशिक येथे विंग कमांडर प्रदीप बागमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोल्फ संघटना आणि निफाडच्या रिव्हर साईड गोल्फ कोर्सच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा वापर इतर खेळाप्रमाणे सर्व थरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. तसेच यापुढेही आणखी सहकार्य देण्याचा प्रयत्न राहील, असेही नाईक यांनी नमूद केले.

नाईक यांच्या सत्काराप्रसंगी रिव्हर साईड गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार, शितल बागमार, गोल्फ आणि लॉन टेनिस खेळाचे संघटक राजीव देशपांडे, अनिल घाणेकर, धवल पटेल, अपूर्व भांडगे, क्रीडा संघटक स्नेहल देव, सुनील देव, आनंद खरे, विजय कुमावत आदी उपस्थित होते.

नाईक यांनी आपल्या तीन – चार वर्षांच्या कार्यकाळात नाशिकच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाची भूमिका पार पडली आहे. नेहमीच्या खेळांबरोबर नवीन खेळांच्या क्रीडा संघटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासासाठी काम केले. कार्यालयीन कामाबरोबर प्रत्यक्ष मैदानात जाऊन खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, क्रीडा संघटना आणि शासनाचा क्रीडा विभाग यांच्यामध्ये संवाद सुरू केला. नाशिकमध्ये गोल्फ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी  संवाद साधून  गोल्फ हा खेळ शालेय स्तरापासून खेळला जावा यासाठी प्रयत्न केले. नाशिकच्या शालेय खेळाडूंना गोल्फ खेळण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या तीन- चार वर्षांच्या कार्यकाळात सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थ्यांना गोल्फ खेळण्याची संधी मिळाली. टाळेबंदीत विविध संघटना, संघटक, प्रशिक्षक यांच्याशी समन्वय साधून अनेक ऑनलाईन कार्यक्रम केले. विविध खेळांची माहिती आणि नियमांचे एकत्रित पुस्तक तयार केले.