scorecardresearch

नाशिक: राष्ट्रवादी श्रीमंत मराठ्यांचा पक्ष – प्रकाश आंबेडकर यांची टीका

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरीबाला सत्तेत येऊ द्यायचे नसल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदविला.

नाशिक: राष्ट्रवादी श्रीमंत मराठ्यांचा पक्ष – प्रकाश आंबेडकर यांची टीका
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबईत महाविकास आघाडीने काढलेला मोर्चा हा शिवसेनेचाच मोर्चा होता. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी केवळ नावापुरतेच राहिले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असून त्यांना गरीब मराठाही चालत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरीबाला सत्तेत येऊ द्यायचे नसल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदविला.

हेही वाचा >>>नाशिक: शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा रोख कुणावर ?

भारतीय बौध्द महासभेच्या वतीने येथे आयोजित धम्म मेळाव्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध असल्याने मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचा संबंधच येत नसल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेशी युती करण्याची भूमिका आहे. या संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांनी मध्यंतरी आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा विचार करू, असे कळविले होते. मात्र अजित पवार यांनी हा प्रश्न अजून विचाराधीन असल्याचे म्हटले होते. याचा अर्थ नाही असा होतो. राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असून त्यांना गरीब मराठा देखील चालत नसल्याचा टोला आंबेडकर यांनी लगावला.

हेही वाचा >>>तंत्रमात्रेमुळे बिबट्यांचा अधिवास धोक्यात; मुक्त विद्यापीठाच्या प्रणालीची वन विभागाकडून पडताळणी

महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. महापुरूषांनी समाजात आदर्श ठेवला. भाजपचा सामाजिक व राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे प्रतिके नाहीत. जी प्रतिके आहेत, त्यांच्याविरोधात अनुचित भूमिका घेण्याचे काम सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्थांची उभारणी कशी केली, याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी त्यांनी वेळ दिल्यास त्यांचा जाहीर सत्कार केला जाईल, असे आंबेडकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 18:55 IST

संबंधित बातम्या