scorecardresearch

रखडलेल्या कामामुळे वनोली-सटाणा रस्ता खड्डेमय, धुळीचे साम्राज्य; ठाकरे गटाकडून आंदोलन

रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले.

Vanoli Satana road bad condition
रखडलेल्या कामामुळे वनोली-सटाणा रस्ता खड्डेमय (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक – साक्री ते शिर्डी महामार्गावरील वनोली ते सटाणा यादरम्यान अर्धवट रस्ता कामामुळे मोठे खड्डे पडले असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांसह शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले.

साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर वनोली ते सटाणादरम्यान अनेक दिवसांपासून काम बंद पडले आहे. बंद कामामुळे रस्त्यावर धूळ, खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. धुळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. विंचूर-प्रकाशा महामार्ग सातचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून नवीन रस्ता साक्री-शिर्डी निर्माण केला जात आहे. सध्या वनोली ते सटाणादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, तीन वर्षांपासून हे काम अतिशय संथपणे केले जात असल्याने वाहनधारक तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात दोन दिवस नदी सर्वेक्षणासह पर्यावरणविषयक उपक्रम; जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांची उपस्थिती

हेही वाचा – नाशिक : उपोषणकर्ते मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

रस्ता काम करताना एका बाजूचे काम केल्याशिवाय दुसरी बाजू खोदू नये, असे असताना या ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला असल्याने धूळच धूळ उडत आहे. हे काम तातडीने करावे, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वनोलीजवळ रास्तारोको केला. आंदोलनामुळे संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधीने धाव घेतली. रस्त्याच्या कामासाठी लागणारी यंत्रणा आणून हे काम जलदगतीने करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तीन-चार दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास आसपासच्या गावातील ग्रामस्थांना एकत्र करीत आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनात ठाकरे गटाचे नेते जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत भामरे, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे आदींनी सहभाग घेतला.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 21:01 IST
ताज्या बातम्या