हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद असला तरी शुक्रवारी शहर-परिसरात सरकारी कार्यालये, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आदींतर्फे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त युवकांनी भगवे ध्वज हाती घेऊन दुचाकी फेरी काढली. ठिकठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिवकार्य गडकोट मोहिमेच्यावतीने गड-किल्ल्यांविषयी माहिती देणारे प्रदर्शन तसेच दुर्ग संवर्धनने किल्लेविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
महापालिकेच्यावतीने पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, बिटको हायस्कूल, शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच पालिका मुख्यालयात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रदेश सरचिटणीस नाना महाले यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शहराध्यक्ष आ. जयंत जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. सध्याच्या सरकारला निवडणुकीत मते मागताना शिवरायांची आठवण होते. आम्ही महाराजांच्या विचारांचे व शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. श्री छत्रपती शिवाजी स्मारक समिती आणि मराठा विद्या प्रसारक समाज यांच्यावतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक अनिता पाटील, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सीबीएस येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवरायांच्या कार्याविषयी मान्यवरांनी माहिती दिली.
वाघ गुरूजी शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. येवला येथील श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब राहणे, प्रांत वासंती माळी आदी उपस्थित होते. यावेळी इतिहास अभ्यासक डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजिलेल्या मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धेतील विजेते वैभव फरताळे आणि प्रथमेश चौधरी यांना गौरविण्यात आले. शिवकार्य गडकोट मोहिमेच्यावतीने सीबीएस येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राज्यातील शिवकालीन किल्ल्यांचा इतिहास सांगणारे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात विविध किल्ल्यांची माहिती, त्यांची सद्य:स्थिती, तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व या विषयावर माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. दुर्ग संवर्धन समितीच्यावतीने साधना आर्ट गॅलरी येथे नाशिक जिल्ह्य़ातील २५ किल्ल्यांविषयी माहिती देणारे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ गिर्यारोहकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. औरंगाबाद येथील अपंग गिर्यारोहक शिवाजी गाडे यांनी आपल्या अपंगावर मात करत ८७ किल्ल्यांवर चढाई केली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव दुर्ग संवर्धन विशेष पुरस्काराने करण्यात आला. प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार असून विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संवर्धन समितीचे प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.