Nashik Rain News : पुण्यातल्या पावसाच्या बातम्या आणि पुरस्थितीच्या बातम्या ताज्या असतानाच आता नाशिकमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने ( Nashik Rain ) दमदार हजेरी लावत नाशिकला झोडपून काढलं आहे. जून महिन्यात नाशिकमध्ये पावसाने ओढ दिली होती. जुलै महिन्यात काही सरी कोसळल्या होत्या. आता मात्र पाऊस ( Nashik Rain ) दोन महिन्यांचा बॅकलॉग भरुन काढतोय का? अशी स्थिती नाशिकमध्ये आहे. दिंडोरीतील पुणेगाव हे धरण ८० टक्के भरलं आहे. या धरणातून ३०० क्युसेक्सने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यात जो पाऊस होतो आहे त्यामुळे वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणं ओव्हर फ्लो होतील अशी स्थिती आहे.

दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी

नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर ( Nashik Rain ) आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं आहे. गोदावरी नदी काठावर असलेली अनेक मंदिरं पाण्यात आहेत. नाशिकमध्येच असलेल्या गंगापूर या धरणातून ८ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पात्रात आणखी वाढ होईल. आता नाशिकला हवामान खात्याने पावसाचा ( Nashik Rain ) यलो अलर्ट दिला आहे. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

नाशिक परिसरात मोठा पाऊस ( Nashik Rain ) सुरु असल्याने गंगापूर धरणातून ६००० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. मात्र रात्री ८.३० वाजतापासून तो विसर्ग ८ हजार क्युसेक इतका होईल. सर्व संबंधित यंत्रणांना याची माहिती सिंचन विभागाने दिली असून, सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली आहे तसंच संबंधित सिंचन विभागाला आणि प्रशासानाला योग्य सूचना केल्याचं म्हटलं आहे.

धनोली धरण ओव्हर फ्लो

मागील दोन दिवसांपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे धनोली हे धरण ओव्हरफ्लो झालं आहे. धरण भरल्याने नदीला पूर आला आहे. नदी काठावर असलेल्या भात आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालं आहे. ४० ते ५० शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान या संततधार पावसाने केलं आहे. तसंच पावसाचा जोर या भागातही वाढला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिकमध्ये पावसाची जोरदार हजेरी आहे. गोदावरी नदीच्या पाणी पात्रात आणखी वाढ होण्याची चिन्हं दिसतं आहेत. (फोटो-ANI)

हे पण वाचा- Jayakwadi Dam: गंगापूर धरणातून प्रथमच विसर्ग, गोदावरी दुथडी भरून; २४ तासांत नाशिकमधून जायकवाडीसाठी पावणेदोन टीएमसी पाणी

सुरगाणा तालुक्यात पावसाचं थैमान

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातही पावसाचं थैमान सुरु आहे. अंबडदहाड नदीवर जो पूल आहे त्यावरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाणं आणि आजारी रुग्णांना रुग्णालय गाठणंही कठीण झालं आहे. ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करुन पुलावरच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जात नदी ओलांडावी लागते आहे. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी सुरगणा ग्रामस्थांकडून सातत्याने होते आहे.