लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुंबईची परसबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाला उत्पादनात कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम मुंबईसह इतरत्र पुरवठ्यावर होत आहे. त्यातच आता पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली असून दरही कडाडले आहेत. परिणामी, भाजीपाला खरेदीत गृहिणींना हात आखडता घ्यावा लागत आहे.

दुष्काळी स्थितीमुळे या वर्षी ही स्थिती उद्भवली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्यासाठी लाखो जणांना टँकरवर अवलंबून रहावे लागले. शेतीसाठी फारसे पाणी उपलब्ध नव्हते. ज्यांच्याकडे ते होते, त्यांना तीव्र उन्हात भाजीपाला उत्पादन जिकिरीचे ठरले. या सर्वाची परिणती पावसाळ्याच्या प्रारंभी भाजीपाला उत्पादनात लक्षणीय घट होण्यात झाली आहे.

आणखी वाचा-नाशिक शिक्षक मतदारसंघ! मविआच्या उमेदवाराला अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याचा पाठिंबा? वाढदिवसानिमित घेतलेली भेट चर्चेत!

जिल्ह्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजीपाल्याचे व्यवहार होणारी मुख्य घाऊक बाजारपेठ आहे. येथून मुंबईला दैनंदिन दीडशे ते दोनशे वाहने भाजीपाला पुरवठा करतात. फारशी आवक नसल्याने मुंबईला एरवी पाठविल्या जाणाऱ्या भाजीपाल्यात घट झाल्याचे साईधन व्हेजिटेबल कंपनीचे संचालक मोहन हिरे यांनी सांगितले. घाऊक बाजारात दर कमालीचे उंचावलेले असल्याने किरकोळ बाजारात येताना तो अधिक महाग होतो. सध्या सर्वच फळभाज्या व पालेभाज्या किमान ५० ते १०० रुपयांच्या घरात आहेत. भाजीपाला महाग असल्याने तो कमी प्रमाणात खरेदी केला जातो. किरकोळ बाजारात ज्या दरात आधी भाजीपाला मिळायचा, तोच दर सध्या घाऊक बाजारात असल्याचे दिसून येते.

घाऊक बाजारात कोथिंबिर ९० रुपये जुडी

सोमवारी बाजार समितीत १२३३ क्विंटल पालेभाज्यांची आवक झाली. हायब्रिड कोथिंबिरला ९० रुपये जुडी (१०० जुड्यांसाठी नऊ हजार) तर गावठी कोथिंबिरला ८० रुपये जुडी (१०० जुड्यासाठी आठ हजार) असा दर मिळाला. या दिवशी बाजार समितीत ३१२० मेथी जुड्यांची आवक झाली. त्यास ४० रुपये जुडी, शेपू ४२ रुपये जुडी आणि कांदा पातीला सरासरी ६५ रुपये जुडीला भाव मिळाला.

आणखी वाचा-नाशिक : भद्रकालीत जमावाच्या हल्ल्यात दोन जण जखमी

फळभाज्याही महाग

एरवी किरकोळ बाजारात ज्या दरात भाजीपाला मिळतो, तेवढाच दर सध्या घाऊक बाजारात आहे. टोमॅटो सरासरी ३० रुपये किलो, दोडका ८३ रुपये (प्रति क्विंटल ८३३० रुपये), कारले ७० रुपये, गिलके ४८ रुपये, भेंडी ४२ रुपये, गवार ४५ रुपये, टोमॅटो ३० रुपये, वांगी ४० रुपये, फ्लॉवर १५ रुपये, कोबी १४ रुपये, भोपळा १८ रुपये, काकडी ३२ रुपये किलो असे दर मिळत आहेत. किरकोळ बाजारात यात दुपटीने वाढ होत असल्याचे ग्राहक सांगतात. महागड्या भाजीपाल्याने घरातील आर्थिक समीकरण बिघडते.

एक, दीड महिन्यांपासून जिल्ह्यात प्रचंड ऊन होते. पाण्याचा अभाव आणि तापमान याची झळ भाजीपाला उत्पादनास बसली. त्यामुळे भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. -देविदास पिंगळे (सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती)