पूर्ववैमनस्यातून संशयितांनी वाहनांची जाळपोळ करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची घटना आडगांव शिवारात रविवारी मध्यरात्री घडली. दोन चारचाकी आणि अ‍ॅपे रिक्षा अशा तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मागील काही महिन्यात वाहनांच्या जाळपोळीचे प्रकार घडले नव्हते. आडगावच्या घटनेने त्यास छेद दिला. आडगांव शिवारात औरंगाबाद रस्त्यावरील यश लॉन्सलगत शंकर वाडेकर राहतात. रविवारी नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या तीन गाडय़ा सम्राट  बेकरी परिसरात लावल्या.

रात्री दोन वाजता संशयित अर्जुन सूर्यवंशी व राजू करंडे यांनी वेनटो, स्कोडा आणि अ‍ॅपे रिक्षावर ज्वलनशील पदार्थ टाकत गाडय़ा जाळण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य कोणाला समजू नये यासाठी परिसरातील घरातील दरवाज्यांना बाहेरून कडय़ा लावल्या. अग्नी तांडवात वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून जवळच्या गोदामापर्यंत आगीची झळ बसली. रात्रीच्या सुमारास अचानक धूर पाहिल्यावर काही नागरिक जागे झाले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.

आगीत चारचाकी वाहने जळून खाक झाली. या प्रकरणी वाडेकर यांनी सूर्यवंशी व करंजे यांच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. संशयित व वाडेकर यांच्यात काही कारणास्तव वाद सुरू होते. या वादातून वाहने पेटवून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी शहरात वाहन जाळपोळीचे अनेक प्रकार घडले आहेत. मागील काही महिन्यांत हे प्रकार थांबले असे वाटत असताना ही घटना समोर आली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.